Bengaluru Gang Rape Case : बंगळुरू ग्रामीण परिसरात गंगोदनहळ्ळी गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या गावातील एका महिलेवर तीन इसमांनी सामूहिक बलात्कार केला. बुधवारी रात्री ९.३० ते १२.१५ च्या दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे तिन्ही आरोपी मद्यधुंद अवस्थेत गंगोदनहळ्ळी गावातून जात होते. त्याचवेळी त्यांनी या महिलेच्या घराचं दार ठोठावलं. महिलेने दरवाजा उघडल्यानंतर तिघेही बळजबरीने घरात शिरले.

पीडित महिला ही मूळची कर्नाटकमधील रहिवासी नसून दुसऱ्या राज्यातून बंगळुरूत आली आहे. ती गंगोदनहळ्ली गावात भाड्याच्या घरात राहात आहे. सदर घटनेनंतर तिने ताबडतोब मदनायकनहळ्ली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तीन आरोपींबरोबर आणखी दोन साथीदार होते. पोलीस त्यांच्याही शोध घेत आहेत.

मोबाइल व पैसे लुटले

पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की आरोपींनी बलात्कार केल्यानंतर महिलेच्या घरातील दोन मोबाइल फोन व २५ हजार रुपये लुटले. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. बंगळुरू ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सी. के. बाबा याबाबत म्हणाले, “पोलिसांनी तीन आरोपींना पकडलं आहे. यामध्ये आणखी दोन आरोपी असून ते सध्या फरार आहेत. फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना करण्यात आली आहेत.”

सी. के. बाबा म्हणाले, “पोलीस सध्या अटक केलेल्या आरोपींकडे त्यांच्या इतर दोन साथीदारांबाबत चौकशी करत आहेत, जेणेकरून त्यांना देखील पकडता येईल.” दरम्यान, या घटनेमुळे गंगोदनहळ्ळी गावात दहशत निर्माण झाली आहे.