कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस जिल्हा न्यायालयाने सोमवारी (१ एप्रिल) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. त्यानंतर ‘आप’चे नेते आणखी आक्रमक झाले आहेत. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर आरोप केले. आतिशी म्हणाल्या की, भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी माझ्या संपर्क साधण्यात आला. मी पक्षात आले नाही तर एका महिन्याच्या आत मला ईडीकडून अटक करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. माझ्या सहकाऱ्याशी संपर्क साधून हा प्रस्ताव देण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा हे ‘आप’ला नष्ट करू इच्छितात, असेही त्या व्यक्तीने सांगितले असल्याचा आरोप आतिशी यांनी केला.

आम्ही भाजपाच्या धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही आमचे काम करत राहू. ‘आप’च्या आणखी चार नेत्यांना अटक करण्याचे षडयंत्र भाजपाकडून आखण्यात येत आहे, असाही आरोप आतिशी यांनी केला. याआधी सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आधीच तुरुंगात धाडलेले आहे. आणखी चार नेत्यांना तुरुंगात पाठविण्याचे षडयंत्र भाजपाकडून रचले जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

या चार नेत्यांना अटक होणार

आतिशी यांनी पुढे जाऊन या चार नेत्यांचीही नावे सांगितली. “माझ्यासह सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्ढा यांना अटक केले जाऊ शकते. अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आम आदमी पक्ष कोलमडून पडेल, असे त्यांना वाटत होते. पण इंडिया आघाडीची जाहीर सभा पार पडल्यानंतर आणि देशभरातून विरोधकांचा पाठिंबा ‘आप’ला मिळाल्यानंतर भाजपाला भीती वाटू लागली आहे. त्यामुळे आणखी चार नेत्यांना अटक करण्याचे षडयंत्र आखले जात आहे”, अशी टीका आतिशी यांनी केली.

माझ्या आणि माझ्या नातेवाईकांच्या घरावर लवकरच ईडीची धाड पडली जाणार आहे. त्यानंतर आम्हा चारही नेत्यांना समन्स बजावले जाईल आणि मग अटक होईल, असेही आतिशी म्हणाल्या.

नाव जाहीर करा अन्यथा तक्रार दाखल करू

दिल्ली भाजपाचे सचिव हरिश खुराना यांनी आतिशी यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. खुराना म्हणाले की, तुम्हाला प्रस्ताव देणाऱ्याचे नाव जाहीर करा अन्यथा आम्ही तक्रार दाखल करू. “दिवस उजाडला की, आतिशी यांच्याकडून नव्या गोष्टी पेरण्यात येतात. माध्यमात चमकदार विधानं करून खळबळ उडवून देण्याची त्यांना सवय आहे. पण आम्ही त्यांना आव्हान देतो की, भाजपात येण्याचा प्रस्ताव दिलेल्या व्यक्तीचे नाव जाहीर करा, अन्यथा आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करू.