शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माजगाव येथील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील डर्टी डझन म्हणत भ्रष्ट नेत्यांविरोधात आम्ही पुरावे तपास यंत्रणांना देणार असल्याचं म्हटलं. याच साऱ्या घडामोडींवरुन शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेनं भाजपाची तुलना तालिबानशी केलीय. भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणं म्हणजे तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखं असल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा शिखंडी प्रयोग आहे
“भारतीय जनता पक्षाने म्हणे भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण भाजपानेही युद्ध पुकारले आहे. तेही भ्रष्टाचाराविरुद्ध! केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईस हे लोक युद्ध वगैरे म्हणत असतील तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या ‘आड’ लपून हे लोक युद्धाचा आव आणीत आहेत. हा शिखंडी प्रयोग आहे,” असा टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या ‘शिखंडीचे युद्ध’ या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून लगावलाय.

पुणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा उल्लेख…
“मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांचे पथक पोहोचले. त्यांना जो तपास करायचा तो करतील, पण भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्यांना एक आठवण करून द्यायची आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपा स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना महापालिकेतच लाखो रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली व आठवडाभर जेल भोगून ते पुन्हा स्थायी समितीचा पुढला भ्रष्टाचार करण्यासाठी रुजू झाले. यावर भाजपावाले तोंड का उचकटत नाहीत? पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील स्मार्ट सिटी घोटाळा ही जनतेच्या पैशांची लूट असून भाजपाचेच लोक त्या लुटीचे भागीदार आहेत,” असं म्हणत शिवसेनेनं पुण्यामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपाला डिवचलं आहे.

नक्की वाचा >> Ukraine War : “…तर ५ लाख किलो वजनाचं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन भारतावर पाडायचं का?”; रशियाची अमेरिकेला धमकी

अटकपूर्व जामिनासाठी का गेले आहेत?
“नागपूर महापालिकाही या कामी मागे नाही. त्यामुळे भाजपाच्या भ्रष्टाचारविरोधी युद्धात पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील घोटाळय़ांचा समावेश आहे काय? किरीट व नील सोमय्या या पिता-पुत्रांनी राकेश वाधवानच्या मदतीने केलेला घोटाळा भविष्यात त्यांना तुरुंगात ढकलत नेणार आहे. कर नाही तर डर कशाला हे भाजपावाल्यांचे म्हणणे मान्य केले तर घामाघूम झालेले नील किरीट सोमय्या हे सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी का गेले आहेत?”, असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.

नक्की वाचा >> दिशा सालियन प्रकरण : नितेश राणेंनी केला राज ठाकरेंचा उल्लेख; म्हणाले, “राज ठाकरेंची शिवसेनेमधील…”

तुमच्याही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही
“महाविकास आघाडीचे ‘डर्टी पाच डझन’ नेते तुरुंगात जाणार अशी घोषणा चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या करतात. म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून आणि वापरूनच हे करणार ना? मग तुमचे ‘डर्टी डझन’ त्या वेळेला काय सिमल्याच्या बर्फात स्वर्गसुखाचा आनंद घेत बसणार आहेत का? किरीट सोमय्या, नील सोमय्या, प्रसाद लाड, पुण्याचे मोहोळ, गिरीश महाजन, मुनगंटीवारांचा ‘झाड’ घोटाळा, अमोल काळे, विजय ढवंगाळे यांचा महापोर्टल आयटी घोटाळा, अगदी चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात ते लवकरच कळेल. पोलीस भरती घोटाळाही रटरटून शिजलाच आहे. आता सुरुवात झालीच आहे तर तुमचेही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की पाहा >> Photos: व्लादिमिर Vs वोलोडिमिर! युक्रेन युद्धात पुतिन यांना नडणारा ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’

भाजपा पूर्वी पाठीमागून वार करणारी होती व आता
“दरेकरांनी तर मुंबै बँक लुटून फस्त केली. त्यामुळे तिथेही तेरावे उरकावेच लागेल! राज्य गमावले म्हणून शिखंडीप्रमाणे युद्धात उतरण्यापेक्षा आमने सामने येऊन युद्ध करण्याची हिंमत दाखवा. चंद्रकांत पाटील म्हणतात, भाजपा आता पूर्वीची राहिलेली नसून शिवसेनेला पुरून उरेल. पाटील म्हणतात ते खरेच आहे. भाजपा पूर्वी पाठीमागून वार करणारी होती व आता तिचे रूपांतर शिखंडीत झाले आहे. हा बदल तर दिसतोच आहे. पुरून उरण्याची भाषा कसली करता? भविष्यात तुम्हीच किती उरताय ते पहा. युद्धाला युद्ध म्हणायचे असेल तर समोर या आणि लढा. केंद्रीय तपास यंत्रणांचा बळजबरी वापर म्हणजे युद्ध नव्हे,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.

शिखंडींच्याही कमरेला धोतर आहे व त्याचीही गाठ सुटू शकते
“इतिहासातला सगळ्यात मोठा बँक घोटाळा गुजरातमधील ऋषी अगरवाल या माणसाने केला व तो आजही मोकळाच आहे. केंद्रीय मंत्री राणे यांच्या शंभर बोगस कंपन्यांतून मनी लॉण्डरिंग कसे झाले ते सर्व पुरावे किरीट सोमय्या यांनीच ‘ईडी’कडे नेऊन दिले व राणेंच्या अटकेची मागणी केली. त्यावर चंद्रकांत पाटील, फडणवीस व भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे इतर शिखंडी गप्प का? केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडींच्या हातातील हत्यारे झाली आहेत व देशाला त्यापासून धोका आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याची बदनामी करण्यासाठी हे शिखंडी अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले आहेत, पण या शिखंडींच्याही कमरेला धोतर आहे व त्याचीही गाठ सुटू शकते हे त्यांनी विसरू नये,” असं लेखात म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: रशिया दौऱ्यात इम्रान खान यांच्या कुरापती; युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना म्हणाले, “काश्मीर प्रश्न…”

भाजपाने भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची घोषणा करणे म्हणजे…
“प. बंगाल व महाराष्ट्रातले सरकार भाजपाच्या डोळय़ात खुपते, पण ही दोन्ही सरकारे बहुमतातली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे शिखंडी हल्ले बहुमताचे मनोधैर्य खच्ची करू शकणार नाहीत. भाजपाचे ‘डर्टी डझन’ एक दिवस तुरुंगात नक्कीच जातील. भाजपाच्या ‘डर्टी डझन’वाल्यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची घोषणा करणे म्हणजे तालिबान्यांनी रशिया व युक्रेनला शांततेचे आवाहन करण्याचा विनोदी प्रकार आहे. तालिबानने शांततेचे व मानवतेचे रक्षण करण्याचे आवाहन कालच केले व त्याच वेळी महाराष्ट्रात भाजपा ‘डर्टी’ने भ्रष्टाचाराविरुद्ध युद्धाची घोषणा केली. परमबीर सिंह यांना वरपासून खालपर्यंत प्रत्येक न्यायालयात अटकेपासून दिलासा मिळतो. त्यांची चौकशी करू नका असे वरचे न्यायालय सांगते. यापेक्षा भयंकर भ्रष्टाचार जगाच्या इतिहासात झाला नाही,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> Russia vs Ukraine War: रात्री उशीरा पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन; फोनवर म्हणाले, “रशियाचे…”

हिंमत असेल तर
“विरोधात बोलणाऱ्यांचे संबंध दाऊदशी जोडायचे, मनी लॉण्डरिंगची खोटी प्रकरणे बनवायची, त्यांची यथेच्छ बदनामी करायची हेच सुरू आहे. कारण हे करणाऱ्यांच्या मनगटात ताकद नाही, दंडावरील बेडक्यांत जोर नाही. शिखंडीला पुढे करून युद्ध करायचे. हिंमत असेल तर निधडय़ा छातीने पुढे या. आहे हिंमत?,” असं लेखाच्या शेवटी म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp fighting against corruption is like taliban calling for peace in ukraine says shivsena scsg
First published on: 26-02-2022 at 08:15 IST