भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी बिहार विधानसभा निवडणुका आणि मध्यप्रदेशात पार पडलेल्या पोटनिवडणुकांवर आपली प्रतिक्रिया दिली. बिहारमध्ये महाआघाडीचं नेतृत्व करणाऱ्या तेजस्वी यांदव यांची स्तृती करत ते एक चांगले व्यक्ती असल्याचं वक्तव्य उमा भारती यांनी केलं. तसंच ते बिहारला चालवू शकतात. परंतु थोडं मोठं झाल्यानंतर. त्यांच्याकडे राज्य चालवण्याचा कोणताही अनुभव नाही, असंही त्या म्हणाल्या. याव्यतिरिक्त उमा भारती यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचीदेखील स्तुती केली.

बुधवारी भोपाळमध्ये उमा भारती यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकांच्या निकालांवर भाष्य केलं. “तेजस्वी यादव हे एक चांगले व्यक्ती आहेत. परंतु सध्या ते राज्य चालवण्यास सक्षम नाहीत. राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा बिहारला जंगलराजमध्ये ढकललं असतं. तेजस्वी यादव हे नेतृत्व करू शकतात. परंतु थोडं मोठं झाल्यानंतर,” असंही उमा भारती म्हणाल्या.

आणखी वाचा- कोण आहे भाजपाचा सायलेंट व्होटर? नरेंद्र मोदींनी केला खुलासा; म्हणाले…

आणखी वाचा- मतदार हा कोणाचा गुलाम नाही; आता बंगालमध्येही निवडणूक लढवण्यावर विचार : ओवेसी

“कमलनाथ यांनी ही निवडणूक चांगल्याप्रकारे लढली. परंतु त्यांनी जर आपलं सरकार योग्यरितीनं चालवलं असतं तर आज या ठिकाणी इतक्या समस्या निर्माण झाल्या नसत्या. ते एक चांगले व्यक्ती आहेत आणि माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांनी ही निवडणूक खुप अत्यंत हुशारीनं लढली,” असंही त्या म्हणाल्या.