काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यासाठी आलेले भाजपा नेते तेजस्वी सूर्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजस्वी सूर्या आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेथे पोहोचले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
यावरून आम आदमी पक्षाने आता भाजपवर निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी तोडफोडीचे आदेश दिले होते का?, असे आप नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्या पोलीस बसच्या छतावर चढले होते. आंदोलनादरम्यान केजरीवाल यांच्या घराच्या गेटलाही भगवा रंग देण्यात आला होता. याबाबत भाजपा खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले की, त्यांना केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांसोबत कसा नरसंहार झाला याची आठवण करून द्यायची होती. त्यामुळे ते आज रस्त्यावर उतरले आहेत.
या निदर्शनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली. याबाबत आप नेते राघव चढ्ढा यांनी म्हटलं आहे की, पंजाबमधील पराभवानंतर भाजपाला धक्का बसला आहे. ते म्हणाले- “माननीय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपाच्या गुंडांनी केलेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. पोलिसांच्या उपस्थितीत या गुंडांनी बॅरिकेड्स तोडले, सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. पंजाबच्या पराभवाच्या रागात भाजपा अशा बेगडी राजकारणावर घसरला आहे.