पंजाबमध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामध्ये पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून ३४ कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्याच्या धक्क्यामुळे दोन मजल्यांची आख्खी इमारतच जमीनदोस्त झाली. पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील सिंगवाला गावातील फटाक्यांच्या कारखान्यात गुरुवारी मध्यरात्री हा स्फोट झाला. या स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी कारखान्यात नियमांना डावलून काम केलं जात असल्याची बाब समोर आली आहे.

सिंगवाना गावात तरसेम सिंग यांच्या मालकीचा हा फटाक्यांचा कारखाना होता. स्फोटाच्या प्रचंड तीव्रतेमुळे ही दुमजली इमारत कोसळली आहे. मध्यरात्री स्फोट झाला तेव्हा काही कामगार काम करत होते तर काही कामगार झोपले होते. त्यामुळे इमारत कोसळली तेव्हा अनेक कामगार त्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आलं. ढिगाऱ्याखालून पाच मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आहे.

बहुतांश कर्मचारी बिहार व उत्तर प्रदेशचे

दरम्यान, या कारखान्यात काम करणारे बहुतांश कर्मचारी हे उत्तर प्रदेश व बिहारमधून स्थलांतरित झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या स्फोटासंदर्भात या भागातील पोलीस उपअधीक्षक जसपाल सिंग म्हणाले, “स्फोटाची माहिती मिळताच आमची पथकं तातडीनं घटनास्थळी दाखल झाली. पाच कामगारांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून ३४ जण जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे”.

एकाच ठिकाणी उत्पादन व पॅकेजिंगही!

या कारखान्यात नियमांना डावलून एकाच ठिकाणी फटाके तयारही केले जात होते व त्यांचं पॅकेजिंगही केलं जात होतं. त्याशिवाय, अनेक कामगार हे कारखान्यातच राहात होते. “एकदा सर्व जखमींची प्रकृती सुधारली की आम्ही त्यांचा जबाब नोंदवून घेऊ. यातून सदर स्फोटाचं नेमकं कारण समजू शकेल. कारखान्यात नियम डावलून होत असलेल्या गोष्टींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल”, असंही जसपाल सिंद यांनी सांगितलं.

कारखान्यात फटाके बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यामुळेच हा स्फोट झाला असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.

Live Updates