पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यादिशेने शुक्रवारी कराची येथील न्यायालयात एका अज्ञात व्यक्तीने बूट फेकला. तो त्यांना लागला नाही.
मुशर्रफ आपल्या अटकपूर्व जामिनाला मुदतवाढ घेण्यासाठी सिंध उच्च न्यायालयात आले होते. सुनावणीनंतर परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने न्यायालयाच्या इमारतीतील व्हरांड्यात त्यांच्या दिशेने बूट फेकला. तो मुशर्रफ यांच्यांपासून अगदी थोड्या अंतरावर पडला. मुशर्रफ यांच्याजवळ असलेल्या सुरक्षारक्षकांच्या गराड्यात तो बूट पडल्याचे दूरचित्रवाहिन्यांवर दाखविण्यात येत असलेल्या चित्रीकरणावरून दिसते.
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात मुशर्रफ मायदेशी परतले. त्यांच्या परतण्याला पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांनी तीव्र विरोध केला आहे. पाकिस्तानमध्ये परतल्यास त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात येईल, अशीही धमकी त्यांना देण्यात आली होती.