दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये चक्क विधानसभा परिसरातच दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता चांगलाच गदारोळ सुरू झाल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधणं सुरू केलं आहे. एवढच नाही तर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे आमदार तेजस्वी यादव यांनी तर थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय, याप्रकरणी आपली भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या कामकाजावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या मुद्द्य्यावर बोलताना सांगितले की,  “मी त्यांना (उपमुख्यमंत्री) विचारलं, त्यांनी सांगितलं की या परिसरात कुठंतरी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. हे अत्यंत वाईट आहे. हे कसं सहन केलं जाऊ शकतं? मी सभापतींसमोर हे सांगतो, जर त्यांनी परवानगी दिली तर मी सर्वांना आजच याचा तपास करण्यास सांगेन.”

याचबरोबर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे देखील म्हटले की,  “मी मुख्य सचिव आणि डीजीपी यांना चौकशी करण्यासा सांगेन. इथे बाटल्या येत असतील तर ही काही सामान्य बाब नाही. हे कृत्य करणाऱ्यास सोडलं जाऊ नये. कडक कारवाई करावी.”

याचबरोबर, विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी म्हटले की, मी सभागृहाचे नेते (मुख्यमंत्री नितीश कुमार) यांना सांगू इच्छितो की, कारवाई नक्कीच झाली पाहिजे. तर, या प्रकरणावरून विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली असून, राजीनामा देण्याची देखील मागणी केलेली आहे.

बिहार विधानसभेत सापडल्या दारुच्या बाटल्या; तेजस्वी यादव म्हणाले “मुख्यमंत्र्यांच्या चेंबरपासून काही अंतरावर ब्रॅण्ड..,”

विधानसभा परिसरात दारुच्या मोकळ्या बाटल्या मिळाल्याची माहिती मिळताच तेजस्वी यादव घटनास्थळी पोहोचले होते. तेजस्वी यादव यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे. हे आश्चर्यकारक असून मुख्यमंत्र्यांच्या चेंबरपासून काही पावलांच्या अंतरावर वेगवेगळ्या ब्रॅण्डची दारु उपलब्ध असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.