युरोपीय समुदायाने भारतातून आयात केल्या जाणाऱ्या हापूस आंब्यांवर बंदी घातली असून ती उठवण्याकरिता ब्रिटन भारताला मदत करणार आहे.
युरोपीय समुदायाचे एक पथक सप्टेंबरमध्ये भारतात तपासणीसाठी येणार असून त्याआधीच ब्रिटन सरकारची संस्था भारतीय अधिकाऱ्यांना या पथकाने बंदीचा निर्णय उठवावा यासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येतील हे सांगणार आहे.
अनिवासी भारतीय असलेले मजूर पक्षाचे खासदार कीथ वाझ यांनी भारतीय हापूस आंब्यावरील बंदी उठवण्यासाठी पुढाकार घेतला असून, त्यांना ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याकडून एक पत्र प्राप्त झाले आहे, ते पत्र युरोपीय समुदायाने हापूस आंब्यांवर घातलेल्या बंदीच्या संदर्भात आहे.
या पत्रात पंतप्रधान कॅमेरून यांनी भारतीय अधिकाऱ्यांना युरोपीय समुदायाचे पथक तपासणीसाठी येण्याच्या आधी अन्न व पर्यावरण संशोधन संस्थेकडून काही सुधारणा उपाययोजना सुचवल्या जातील असे सांगितले आहे.  भारतीय हापूस आंब्याच्या आयातीवर १ मे पासून बंदी घातली असून ती डिसेंबर २०१५ पर्यंत कायम राहणार आहे. ब्रसेल्स येथील अधिकाऱ्यांना आंब्याच्या पेटीत फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे युरोपचे सॅलड पीक खराब होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.
 वाझ यांनी गुरुवारी आरोग्य आयुक्त टोनियो बोर्ग यांच्याशी चर्चा केली व २ सप्टेंबरला भारतीय आंब्यांची तपासणी तेथे जाऊन पथकामार्फत केली जाईल असे स्पष्ट केले. वाझ यांनी सांगितले, की भारतीय आंब्यावर प्रदीर्घ काळ बंदी राहू नये असे आपल्याला वाटते, त्यामुळे आपण ही बंदी उठवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.