देशातील सर्वात मोठी व्यापारी संघटना असणाऱ्या ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (कैट म्हणजेच CAIT ) आता रक्षाबंधन हे पूर्णपणे भारतीय राखी वापरुनच साजरं करण्याचं आवाहन केलं आहे. ३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून कोणीही चिनी मालापासून बनवलेल्या राख्या वापरु नयेत असं आवाहन कैटने केलं आहे. ‘भारतीय सामान आमचा अभिमान’ या मोहिमेअंतर्गत १० जूनपासून कैटकडून बहुआयामी राष्ट्रीय मोहीम सुरु करण्यात आली आहे. ही मोहीम सुरु केल्यानंतर रक्षाबंधन हा पहिला मोठा सण असेल ज्यामुळे चिनी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे असं कैटने म्हटलं आहे. कैटने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा चिनी राख्यांवर बंदी घातल्यास चीनला ४ हजार कोटींचे नुकसान होणार आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
चिनी राख्यांवर बंदी घातल्यास चीनला चार हजार कोटींचे नुकसान होईल. एका आकडेवारीनुसार देशात रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर ६ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल राखी उद्योगामध्ये होते. त्यापैकी केवळ चिनी राख्यांची बाजारपेठ ही चार हजार कोटींची आहे. रक्षाबंधनच्या पारश्वभूमीवर चीनमधून या राख्या भारतामध्ये येतात. तर दुसरीकडे फोम, कागद, राखी धागा, मोती आणि राखीवरील सजावटीचे बरेचसे सामानही चीनमधून आयात होते. मात्र यंदा भारत आणि चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही आयात न करण्याचा निर्णयाच कैटने घेतला आहे. यंदाची राखी ही पूर्णपणे भारतीय असावी असा आग्रह कैटचा आहे. त्यामुळेच चिनी मालाचा वापर करुन राख्या बनवू नयेत आणि त्यांच्या व्यवसायही करु नये असं आवाहन कैटने व्यापाऱ्यांना केलं आहे.
“कैटने वेगवेगळ्या राज्यांमधील आपल्या सभासदांना शहरांमधील स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या संस्था, महिला बचत गट, आंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने राख्या तयार करण्यास पुढाकार घ्यावा. या माध्यमातून या महिलांना आर्थिक मदत होईल आणि पूर्णपणे भारतीय राखी बनवण्याचा हेतूही साध्य होईल,” असं मत दिल्ली विभागाचे कैटचे सुशिल कुमार जैन यांनी सांगितलं.
कैटच्या माध्यमातून भारतीय सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांसाठीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मदतीने पाच हजार राख्या पाठवल्या जाणार आहेत. तसेच फेड्रेशनच्या महिला विंगच्या माध्यमातून देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचे काम करणाऱ्या पोलिसांना तसेच लष्करी रुग्णालयातील जवानांनाही राखी बांधली जाणार आहे.