सन २०१६ मध्ये केलेले सर्जिकल स्ट्राइक, पाकिस्तानातील बालाकोटमध्ये दहशतवादी तळांवर केलेला हवाई हल्ला याचा संदर्भ देताना भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मंगळवारी आपली भुमिका स्पष्ट केली. जवानांच्या मारेकऱ्यांशी शांततेच्या चर्चा करण्यावर मोदी सरकारचा विश्वास नाही असे त्यांनी म्हटले आहे. तेलंगाणातील शामशाबाद येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

शाह म्हणाले, पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पुलवामात आपल्या ४० सीआरपीएफ जवानांचे प्राण घेतले. त्यानंतर आता सरकारकडून काय पावले उचलली जातील याची सर्वांना चिंता होती. भारताकडून पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक होते की काय या भितीने पाकिस्तानने सीमेवर त्यांचे सैन्य तैनात केले. मात्र, मोदी सरकारने पाकिस्तानला हवाई हल्ल्याद्वारे सडेतोड उत्तर दिले आणि बालोकोटमधील त्यांचे दहशतवादी तळ उद्धवस्त केले. या हवाई हल्ल्यानंतर देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, त्यावेळी दोनच ठिकाणी शोक व्यक्त करण्यात आला. एक म्हणजे पाकिस्तान आणि दुसरे म्हणजे राहुल गांधी आणि त्यांच्या कंपनीमध्ये.

राहुल गांधींचे गुरु सॅम पित्रोडा म्हणाले, या छोट्याशा घटनेसाठी तुम्ही हवाई हल्ला का केला? मात्र, पत्रोडांना मी सांगू इच्छितो ही छोटी गोष्ट नव्हती. तुम्ही दहशतवाद्यांसोबत इलू-इलू करु शकता. मात्र, आपल्या जवानांना मारतील अशा शत्रूला सडोतोड उत्तर देण्यामध्ये मोदी सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे अशा देशांशी आपण शांततेच्या चर्चांमध्ये अडकू शकत नाही, असे शाह म्हणाले.

दरम्यान, तेलंगाणातील के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारवर हल्लाबोल करताना शाह म्हणाले, यापुढे १७ सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्राम हे सरकार साजरे करु शकणार नाही. कारण ते असदुद्दीन ओवैसींना घाबरले आहेत. निवडून आल्यानंतर दोन महिन्यानंतरही केसीआर यांना आपले मंत्रीमंडळ स्थापन करता आलेले नाही, त्यामुळे तुम्ही असल्या व्यक्तीकडून आणि पक्षाकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल यावेळी त्यांनी जनतेला विचारला.

काँग्रेसप्रमाणेच केसीआर यांचा पक्ष देखील घराणेशाही चालवणारा पक्ष आहे. त्यामुळे केसीआरनंतर त्यांचा मुलगा, मुलगी किंवा जावईच पुढचा मुख्यमंत्री होईल हे सर्वांना माहिती आहे. युपीए सरकारने तेलंगाणासाठी १६,५०० कोटी रुपये दिले होते. मात्र, मोदी सरकारने २,४५,८४७ कोटी रुपये तेलंगाणाच्या विकासासाठी दिले, असे ते यावेळी म्हणाले.