भारत आणि पाकिस्तान यांच्यात त्रयस्थ देशात क्रिकेट सामने खेळवण्याच्या आशेवरही आता परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सुरुंग लावला आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधी उल्लंघन आणि त्यात भारतीय जवानांना आपले प्राण गमवावं लागणं हे भारत-पाक सामन्यांसाठी योग्य वातावरण नसल्याचं स्वराज यांनी म्हटलंय. अतिरेकी हल्ले करुनही पाकिस्तान क्रिकेट सामने खेळण्याची अपेक्षा कशी करु शकतं? असा सवालही सुषमा स्वराज यांनी विचारला आहे.

परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि सुषमा स्वराज यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांशी संबधांवर नुकतीच पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भारत-पाक क्रिकेट मालिकेबद्दल सुषमा स्वराज यांना विचारलं असता, “मानवतेच्या दृष्टीकोनातून मध्यंतरी दोन्ही सरकारने आपल्या कैदेत असलेल्या इतर देशांतील कैद्यांना सोडण्यावर एकमत निर्माण झालं होतं. यावेळी भारताने काही पाकिस्तानी नागरिकांना भारतात उपचार घेण्यासाठी तात्काळ वैद्यकीय व्हिजाही उपलब्ध करुन दिला होता. मात्र त्यानंतरही पाकिस्तान सीमेपल्याडहून कुरापती करतच आहे. त्यांचं हे वागण क्रिकेट मालिका खेळण्यासाठी निश्चीतच योग्य नसल्याचं” स्पष्टीकरण सुषमा स्वराज यांनी दिलं.

हिजबुल मुजाहिद्दीनचा तरुण कमांडक बुरहान वाणी याला गेल्या वर्षात भारतीय फौजांनी काश्मिरमध्ये यमसदनास धाडलं. या घटनेनंतर पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आलं. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये अनेक भारतीय नागरिक आणि सुरक्षा रक्षकांना आपले प्राण गमवावे लागले. यातच हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी कैदेत असलेल्या कुलभुषण जाधव याच्या परिवाराला पाकिस्तानमध्ये अधिकाऱ्यांकडून चांगलाच त्रास देण्यात आला. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने होणं अशक्य असल्याचे संकेत सुषमा स्वराज यांनी दिले.