Ankita Bhandari Murder Case: १९ वर्षीय तरूणी अंकिता भंडारीचा २०२२ साली झालेल्या हत्याप्रकरणात भाजपाचे माजी नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य आणि इतर दोघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी ४७ साक्षीदारांचे जबाब आणि व्हॉट्सॲप चॅट्सचे पुरावे ग्राह्य धरण्यात आले आहेत. उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यातील एका न्यायालयाने शुक्रवारी आरोपींना शिक्षा सुनावली.

पुलसित आर्य चालवत असलेल्या रिसॉर्टमध्ये अंकिता भंडारी रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करत होती. हॉटेलमधील ग्राहकांना तिने स्पेशल सर्विस द्यावी, म्हणून पुलकित तिच्यावर दबाव टाकत होता. या दरम्यान अंकिताची हत्या झाल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. तर अंकिताने आत्महत्या केल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. बचाव पक्षाने दावा केला की, अंकिता निराश होती. तिला तिचे घर सोडून एका मित्राशी लग्न करायचे होते.

४ सप्टेंबर २०२२ रोजी अंकिताचा मृतदेह ऋषिकेशमधील एका कालव्यात आढळून आला. मृतदेह सापडण्याच्या सहा दिवस आधी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.

व्हॉट्सॲप चॅट्समधून उलगडले सत्य

सरकारी वकिलांनी म्हटले की, अंकिता रिसॉर्टमध्ये कामाला लागल्यापासून ते तिचा मृत्यू होईपर्यंतचे व्हॉट्सॲप चॅट्स पाहिले तर ती आरोपीच्या वर्तनामुळे त्रस्त होती, हे दिसून येते. आरोपीचा अश्लील प्रस्ताव आणि स्पेशल सर्विस देण्याच्या दबावामुळे ती रिसॉर्ट सोडणार होती. एका चॅटमध्ये तिने लिहिले, “मी गरीब आहे म्हणून काय मी स्वतः १० हजारांमध्ये विकू का?”

अंकिताचा मृतदेह सापडल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की, तिच्या शरीरावरील जखमा पाहून ती अपघाताने कालव्यात पडल्याचे दिसत नाही. वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की, ती कालव्यात वेगाने खाली आली. जसे की, तिला वरून कुणीतरी ढकलले किंवा फेकले असावे.

सरकारी वकिलांनी पुढे म्हटले की, १८ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी एका साक्षीदारांनी अंकिता फोनवर बोलताना रडताना पाहिले होते. ती इतर कर्मचाऱ्यांना विनंती करत होती की, तिला इथून बाहेर जाण्यासाठी मदत करावी. तिची बॅग बाहेर आणून द्यावी. त्यानंतर आणखी एका साक्षीदाराने तिला आरोपीच्या मित्रासह मोटारसायकलवरून जाताना पाहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिता भंडारीचे शेवटचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले, त्यात ती पुलकित आर्यबरोबर स्कुटरवर बसलेली दिसली. तर त्याचे इतर दोन कर्मचारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता हे दुसऱ्या मोटारसायकलवरून त्यांच्या मागून येत होते. या प्रकरणी खुनाचा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे न्यायालयाने आरोपींना शेवटच्या वेळी पाहिल्याचा सिद्धांत ग्राह्य धरत शिक्षा सुनावली.