बीजिंग : चिनी कम्युनिस्ट पक्षाचे चायनाचे (सीपीसी) शेकडो पदाधिकारी चार दिवसांच्या पक्ष अधिवेशनासाठी सोमवारी जमले असून त्यात या शंभर वर्षांहून जुन्या पक्षाकडून काही महत्त्वाचे व ऐतिहासिक ठराव मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. यात क्षी जिनिपग यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.
पक्षाच्या केंद्रीय समितीची सहावी वार्षिक बैठक होत असून त्यासाठी ४०० पूर्ण व अर्धवेळ सदस्य उपस्थित आहेत. सीपीसीचे सरचिटणीस जिनिपग यांनी राजकीय विभागाच्या वतीने एक अहवाल सादर केला असून त्यात शंभर वर्षांत पक्षाने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. जिनिपग हे ६८ वर्षांचे असून ते पक्षाचे सरचिटणीस.आहेत. केंद्रीय लष्करी आयोगाचेही ते अध्यक्ष आहेत. पुढील वर्षी त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीच्या दोन मुदती पूर्ण होत आहेत. एक मुदत पाच वर्षांची असते. राजकीयदृष्टय़ा आताची बैठक ही जिनिपग यांच्यासाठी महत्त्वाची असून त्यांनी अध्यक्षपदाची नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. माओ झेडाँग यांच्यानंतर ते पक्षाचे सर्वात शक्तिशाली नेते ठरले आहेत. आता त्यांना अध्यक्षपदाची पाच वर्षांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये एक घटनादुरुस्ती करण्यात आली असून त्यात अध्यक्षपदासाठी दोन कार्यकाल म्हणजे दहा वर्षांचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. २०१६ मध्ये ते पक्षाचे सर्वात मुख्य नेते ठरले होते. माओ यांच्यानंतर त्यांना हा मान मिळाला होता. पुढील वर्षी सीपीसी काँग्रेसचे आयोजन करण्यात येत असून त्यात नवीन नेतृत्वाची निवड केली जाण्याची शक्यता आहे.