चीन सरकारने पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या बीजिंग विंटर ऑलिम्पिकच्या आधी राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तियानजिन शहरामधील सर्व नागरिकांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतलाय. या शहरामध्ये एक कोटी ४० लाख लोक राहतात. या सर्वांच्या करोना चाचण्या केल्या जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. या शहरामध्ये करोनाचे काही रुग्ण आढळले असून यामध्ये ओमायक्रॉनच्या दोन रुग्णांचाही समावेश असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.

तियानजिन आणि बीजिंग या दोन शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात लोक ये-जा करत असतात. हायस्पीड बुलेट ट्रेनमुळे या दोन शहरांमधील अंतर अवघ्या ३० मिनिटांवर आलं असल्याने रोजच्या कामांसाठीही अनेकजण या दोन शहरांदरम्यान प्रवास करत असतात. येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरामध्ये २० जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यानंतरच संपूर्ण शहराची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्या. शहरामधील करोना नियंत्रण आणि व्यवस्थापनासंदर्भात निर्माण करण्यात आलेल्या मुख्य केंद्रातून दिलेल्या माहितीनुसार संसर्ग झालेल्या व्यक्ती शुक्रवारी आणि शनिवारी जिनान जिल्ह्यामध्ये दाखल झाल्या होत्या. हे लोक शहरामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘या’ देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही; यादीतील शेवटचे दोन देश पाहून आश्चर्य वाटेल

तियानजिन हे चीनमधील असं पहिलं शहर होतं जिथे ओमायक्रॉनचे रुग्ण सर्वात आधी आढळून आलेले. डिसेंबरमध्ये येथे ओमाक्रॉनचे रुग्ण आढळून आलेले. मात्र त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ झाल्याची कोणतीही माहिती समोर आळी नव्हती. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या शियान आणि इतर शहरांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झालेली. मात्र त्यावेळेस मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात आल्या. दोन ओमाक्रॉनचे रुग्ण वगळता तियानजिनमधील इतर १८ करोना रुग्णांमध्ये एका डे केअर सेंटर आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थी तसेच त्यांच्या घरच्यांचा समावेश आहे.

नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण: Omicron वेगाने का पसरतोय?, लक्षणं दिसण्याचा कालावधी किती? रुग्ण किती दिवसांनी होतात बरे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे रुग्ण आढळून आल्यानंतर शहरातील एक कोटी ४० लाख लोकांच्या करोना चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बीजिंगमध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या चाचण्या केल्या जाणार आहेत. ४ फेब्रुवारीपासून बीजिंगमध्ये विंटर ऑलिम्पिक गेम्सला सुरुवात होतेय.