एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. परंतु, यासंबंधीची कार्यवाही करण्यास महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दिरंगाई करत असल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (३० ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यावर सुनावणी घेतली. या सुनावणीवेळी आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घ्या, असे निर्देश देत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना खडे बोल सुनावले आहेत.
आम्ही निकाल देऊन (११ मे) इतके दिवस झाले आहेत, तरी तुम्ही अद्याप कोणताही निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न उपस्थित करत सरन्यायाधीशांनी राहुल नार्वेकर यांना सुनावलं आहे. राहुल नार्वेकरांच्या वतीने महाधिवक्ते तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला. तसेच महेता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ वाढवून मागितला. परंतु, वेळ वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. LiveLaw ने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या आमदारांच्या अपात्रेप्रकरणीदेखील आज सुनावणी झाली. अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या नऊ आमदारांच्या अपात्रेचा निर्णय ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. हे प्रकरण जानेवारी महिन्याच्या (२०२४) पहिल्या आठवड्यात घ्यावं असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
हे ही वाचा >> “आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घ्या”, निर्देश देत सरन्यायाधीशांनी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुनावले खडे बोल
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी होणाऱ्या दिरंगाईबद्दल सरन्यायाधीशांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. तसेच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, विधानसभा अध्यक्ष एवढा वेळ लावणार असतील तर अशी वेळ येऊ देऊ नका की, आम्हाला आमदारांच्या पात्रता किंवा अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल.