राजस्थान काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच अद्यापही कायम आहे. अशोक गेहलोतांना हटवून काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यास आमदारांनी विरोध केला आहे. त्यानंतर आता मोठी माहिती समोर आली आहे. अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडले आहेत. गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबात एनडीटीव्हीने वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यपदाची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांचं नाव आघाडीवर होते. यासाठी सोनिया गांधी यांनी मल्लिरार्जुन खरगे आणि अजय माकन यांना काँग्रेसच्या आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी पाठवलं होते. मात्र, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री निवासस्थानवरील पूर्वनियोजित बैठकीला हे आमदार फिरकले नाहीत.

हेही वाचा – गेहलोत यांच्या अप्रत्यक्ष बंडामुळे गांधी कुटुंबाला धक्का ; खरगे-माकन माघारी, आता कमलनाथ मध्यस्थी करण्याची शक्यता

विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी ऐेनवेळी ठिकाण बदलून अन्यत्र गेहलोत समर्थक आमदारांची बैठक घेतली. या आमदारांनी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध दर्शवला. गेहलोत निष्ठावानाला मुख्यमंत्री करावे, काँग्रेस पक्षाध्यपदाची निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यावा, अशी मागण्या आमदारांनी केल्या. तसेच, ९० आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपले राजीनामे देत सरकारला अस्थिर आणि गांधी कुटुंबावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर आता काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अशोक गेहलोत यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशोक गेहलोत यांच्याऐवजी मल्लिकार्जुन खरगे, दिग्विजय सिंह यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे.