एका अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे पोर्श गाडी चालवत दोन जणांचा बळी घेतला. पुण्यात ही घटना घडली, त्यानंतर अवघ्या १५ तासांत त्याला जामीन मिळाला आणि कोर्टाने घटनेवर निबंध लिहिण्यास सांगितला. यामुळे समाजमाध्यमं आणि पुण्यासह राज्यभरातून संताप व्यक्त होतो आहे. अशातच आणखी एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीची एक तरुण छेड काढत होता. तिला रोज त्रास देत होता. त्याला त्यावरुन अटक करण्यात आली. मात्र कोर्टाने तो चांगल्या कुटुंबातला मुलगा आहे हे ठरवत त्याला जामीन मंजूर केला आहे.

कुठे घडली आहे ही घटना?

मध्य प्रदेशातला एक महाविद्यालयीन तरुण हा एका अल्पवयीन मुलीची रोज छेड काढत होता. त्याच्या विरोधात अल्पवयीन मुलीच्या आणि तिच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर POCSO अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्या तरुणाला ४ एप्रिल रोजी अटकही करण्यात आली. मात्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. या तरुणाचं कृत्य अयोग्य आहे, मात्र तो चांगल्या कुटुंबातला मुलगा आहे. संस्कारक्षम कुटुंबात त्याची जडणघडण झाली आहे त्यामुळे त्याला सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे असं म्हणत कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

न्यायमूर्ती आनंद पाठक यांनी काय म्हटलं आहे?

न्यायमूर्ती आनंद पाठक यांनी १६ मे रोजी या तरुणाचा जामीन मंजूर केला आहे. या मुलाच्या विरोधात जो गुन्हा नोंद करण्यात आला तो निश्चितच गंभीर आहे. पण हा मुलगा एका चांगल्या कौटुंबिक असलेल्या घरातून आला आहे. त्यामुळे त्याला त्याची चूक सुधारण्याची संधी दिली पाहिजे. त्याने केलेलं वर्तन हे समाजातील कुरुपता दाखवणारं आहे मात्र सुधारणेची एक संधी म्हणून त्याला जामीन देत आहोत असं न्यायमूर्ती आनंद पाठक यांनी म्हटलं आहे. या महाविद्यालयीन तरुणाला दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा महाविद्यालयीन तरुण अल्पवयीन मुलीवर शेरेबाजी करणं, तिचा पाठलाग करणं, छेडछाड करणं हे सगळं करत होता. ज्यानंतर मुलीच्या आणि तिच्या पालकांच्या तक्रारीवरुन त्याला ४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.

हे पण वाचा- “श्रीमंताच्या मुलाला निबंध लिहायला सांगता, ऑटो-टॅक्सी, ट्रक चालकाला…”, पुण्यातील अपघातावरून राहुल गांधींचा टोला

पोलिसांनी नेमकी याबाबत काय माहिती दिली?

पोलिसांनी या मुलाबद्दल माहिती दिली आहे ती अशी की सदर मुलगा अल्पवयीन मुलीला रोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्रास देत होता. तिची छेडछाड काढत होता. What’s App आणि सोशल मीडियावरही तिला स्टॉक करत होता. तिला फोन करुन तिच्याशी अश्लील संभाषण करत होता. मात्र न्यायालयाने या मुलाला जामीन मंजूर केला आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत जिल्हा रुग्णालयात त्याने रुग्णसेवा करावी, कंपाऊंडर्स, परिचारिका यांना रुग्णसेवेत मदत करावी असेही निर्देश न्यायालयाने जामीन मंजूर करताना दिले आहेत. जामीन मिळाला नाही तर माझ्या शिक्षणावर त्याचा परिणाम होईल असं या मुलाने जामीन अर्जात नमूद केलं आहे. ज्यानंतर त्याला चांगल्या कुटुंबातला मुलगा आहे हे म्हणत जामीन देण्यात आला आहे.

मुलाच्या वकिलांनी काय म्हटलं आहे?

महाविद्यालयीन तरुणाला जी शिक्षा झाली त्यातून त्याला समज आली आहे की जे आपण कृत्य करत होतो ते चुकीचं आहे. भविष्यात त्याच्या हातून अशी कृती होणारर नाही. एक चांगला नागरिक होण्याच्या दृष्टीने तो पावलं टाकेल. तसंच कोणत्याही प्रकारे दुसऱ्या व्यक्तीसाठी लाजिरवाणं किंवा छळ करणारं वर्तन करणार नाही असं या मुलाच्या वकिलांनी म्हटलं आहे. आरोपी मुलाचे पालकही न्यायालयात उपस्थित होते. आमच्या मुलाला केलेल्या कृत्याची लाज वाटते आहे त्याच्याकडून असं वर्तन पुन्हा केलं जाणार नाही अशी हमीही त्यांनी न्यायालयात दिली.