नवी दिल्ली : काँग्रेसच्या ११ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे भाजपचे तीन खासदार राजवर्धन सिंह राठोड, सुब्रतो पाठक आणि भोला सिंग यांनी चुकीच्या संदर्भ देत राहुल गांधींची चित्रफीत प्रसृत केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

देशाच्या सामाजिक एकतेसाठी असे करणे धोकादायक आहे. त्यामुळे  शांतताही नष्ट होत असल्याने त्वरित हस्तक्षेपाची मागणी त्यांनी बिर्ला यांच्याकडे केली आहे. ही तक्रार संसदेच्या आचरण समितीकडे पाठवण्यात यावी जेणेकरून त्याची चौकशी होऊन आवश्यक ती कारवाई करता येईल, अशी मागणी  लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आणि इतर दहा खासदारांनी केली आहे. राठोड, पाठक आणि भोला सिंग यांनी राहुल यांची  फेरफार केलेली चित्रफित प्रसारित केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  यात उदयपूर हत्येविषयी राहुल बोलत असल्याचा भासवले होते. ही चुकीची चित्रफीत एका वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती. नंतर त्या वाहिनीने ती मागे घेऊन माफी मागितली होती. मात्र, खोटा प्रचार करण्याच्या उद्देशाने या चित्रफितीचा वापर भाजपच्या सदस्यांनी खोटय़ा आणि विकृत बातम्या प्रसृत करण्यासाठी केल्याचा आरोप काँग्रेस खासदारांनी केला. बिर्ला यांनी भाजप खासदारांच्या या ‘अनैतिक वर्तना’त हस्तक्षेप करण्याचे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे. चौधरी यांच्यासह गौरव गोगोई, के. सुरेश, मणिकम टागोर, रवनीत बिट्टू, एम.के. राघवन, डी. के. सुरेश, संतोख सिंग चौधरी, के. जयकुमार, अँटो अँटनी आणि एस ज्योतिमणी यांनी स्वाक्षरी केली आहे.