दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग

मुख्यमंत्री बदलाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) दिल्लीत हरियाणाचे मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा आणि महाऱाष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली.

मुख्यमंत्री बदलाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) दिल्लीत हरियाणाचे मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा आणि महाऱाष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर महाराष्ट्र, आसाम आणि हरियाणा या तिन्ही राज्यांत मुख्यमंत्री बदल अटळ असून, त्याची सुरूवात आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांच्यापासून होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी आज दिल्लीत सुमारे अर्धा तास चर्चा केली. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केल्याचे समजते. यासंदर्भात आसाममधील काँग्रेस नेते हिमांता बिस्वा शर्मा लवकरच दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची भेट घेणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या भेटीनंतर आसामच्या मुख्यमंत्रीपदावरून तरूण गोगोई यांची उचलबांगडी करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर, महाराष्ट्रातसुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वात फेरबदल केले जाणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पदावरून दूर करण्याची मागणी राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत होती. दरम्यान,  पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर विरोधक नारायण राणे यांच्यासह काँग्रेस नेते  शिवाजीराव मोघे आणि शिवाजीराव देशमुख आज सकाळीच दिल्लीत दाखल झाले.  मात्र, मुख्यमंत्री बदलाचा निर्णय संबंधित राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यातील नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल अशी माहिती पक्षाच्यावतीने देण्यात आली. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress holds talks with chief ministers replacements likely to start with assams gogoi

ताज्या बातम्या