अलीकडे हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने अदाणी समूहावर धक्कादायक आरोप केले होते. या आरोपानंतर अदाणी समूहाला मोठा आर्थिक झटका बसला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. आम्ही हिंडेनबर्ग कंपनीचे कधी नावही ऐकले नव्हते. त्या कंपनीच्या अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसते, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ते ‘एनडीटीव्ही इंडिया’शी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या नियुक्तीची आवश्यकता नाही. एका परदेशी कंपनीच्या अहवालाने देशात खळबळ उडाली. अशाप्रकारची वक्तव्ये यापूर्वीही काही लोकांनी केली होती. काही दिवस संसदेत यावरून गदारोळही झाला होता.”

हेही वाचा : कर्नाटकात कोणाचे सरकार बनणार? शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले…

“आम्ही तर या कंपनीचे कधी नावही ऐकलं नव्हतं. त्या कंपनीची पार्श्वभूमी काय माहिती नव्हते. अशा विषयावर देशात गदारोळ झाला, तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते हे दुर्लक्षित करता येणार नाही,” असेही शरद पवारांनी म्हटले. शरद पवारांच्या विधानानंतर अदाणी समूह आणि हिंडेनबर्ग प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जोरदार चपराक लगावल्याचे बोलले जात आहे. यावर आता काँग्रेसनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शरद पवारांच्या विधानानंतर काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटलं की, “अदाणी समूहाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वत:चे मत असू शकते. पण, पंतप्रधान मोदींचे अदाणी समूहाबरोबर असलेले संबंध, हा मुद्दा १९ समविचारी पक्षांना खरा आणि अत्यंत महत्वाचा वाटतो.”

हेही वाचा : शरद पवारांनी गौतम अदाणींना दिला होता ‘तो’ सल्ला; स्वत: आत्मकथेत केला उल्लेख; म्हणाले, “मी त्यांना सुचवलं होतं की…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपाच्या हल्ल्यांपासून संविधान आणि आपल्या लोकशाहीचे रक्षण करणे गरजेचे आहे. भाजपाच्या फुटीरतावादी आणि विध्वंसक राजकीय, सामाजिक, आर्थिक धोरणांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह २० समविचारी विरोधी पक्ष एकत्र आहेत,” असेही जयराम रमेश यांनी नमूद केले.