कर्नाटकात काँग्रेसला दणक्यात यश मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी मोठं विधान केलं होतं. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जनतेला दिलेली पाच आश्वासने पूर्ण केली जातील, असं आश्वासन राहुल गांधी यांनी केलं होतं. आज कर्नाटकात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर, लागलीच विधानसभ मंत्रिमंडळ बैठकही पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे आदेश नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पाच आश्वासने दिली होती. काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांना फाइव्ह गॅरंटी म्हटले होते. या गॅरंटीची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली होती. मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत काँग्रेसच्या गॅरंटीची कोणतीही वॉरंटी नसल्याची टीका केली होती. पण याच पाच आश्वासनांच्या पूर्तेतेसाठी नवनियुक्त मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आदेश काढले आहेत. तसंच, पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केलं. मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी विधानसभेत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा >> Video : “येत्या एक-दोन तासांत…”, कर्नाटकात शपथविधी सोहळ्यातच राहुल गांधींचा मोठा निर्धार

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून पाच आश्वासने दिली

१. ‘गृह ज्योती’अंतर्गत प्रत्येक घरासाठी २०० युनिटची वीज मोफत देण्यात येईल.
२. ‘गृह लक्ष्मी’ योजनेंतर्गत कुटुंबप्रमुख असलेल्या महिलेला प्रति महिना दोन हजार रुपये देण्यात येतील.
३. ‘युवा निधी’ योजनेच्या माध्यमातून पदवीधर आणि पदविका घेतलेल्या बेरोजगार तरुणांना भत्ता देण्यात येईल.
४. ‘उचित प्रयत्न’ योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना राज्य परिवहन विभागाच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येईल.
५. ‘अन्न भाग्य’ योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेच्या खाली असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला १० किलो धान्य मोफत देण्यात येईल.

या वरील योजनांच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीपासून याची अंमलबजावणी केली जाईल, असं आश्वासन सिदधरामय्या यांनी दिलं. दरम्यान या आश्वासन पूर्ततेसाठी सरकारला ५० हजार कोटींचा खर्च येणार असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

केंद्रावर सडकून टीका

“आधीचं सराकर निरुपयोगी होतं. करातील वाटा त्यांनी राज्यात आणला नाही. वित्त आयोगानुसार केंद्र सरकार आम्हाला ५ हजार ४९५ कोटी देणं लागतं. आधीच्या सरकारने हे पैसे आणले नाहीत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या कर्नाटकातून राज्यसभा खासदार आहेत. त्यांच्यामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कर्नाटकचे अतोनात नुकसान झाले आहे”, असं सिद्धरामय्या म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या एक-दोन तासांत…

“आम्ही खोटी आश्वासने देत नाही. जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो. एक-दोन तासांत कर्नाटकात पहिल्या कॅबिनेटची मिटिंग होईल. या कॅबिनेटमध्ये आम्ही दिलेली आश्वासने कायदे बनतील. शेतकरी, कामगार, लहान दुकानदार, त्याचं संरक्षण करणं आणि भविष्य चमकावणे हे सरकारचं लक्ष्य आहे. आम्ही तु्म्हला स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ. तुम्ही तुमचं प्रेम आणि शक्ती काँग्रेसला दिलीत हे काँग्रेस कधीच विसरणार नाही. हे सरकार कर्नाटकच्या जनतेचं सरकार आहे, आपलं सरकार आहे. आणि आम्ही मनापासून काम करू”, असं आश्वासन राहुल गांधींनी यांनी आज शपथविधी सोहळ्यादरम्यान दिलं होतं. त्यानंतर लागलीच आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आदेश देण्यात आले आहेत.