लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची देशपातळीवरील चौथी आणि महाराष्ट्रातील दुसरी यादी प्रसिद्ध केली. या चौथ्या यादीत एकूण ४५ उमेदवारांचा समावेश असून यामध्ये महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा समावेश आहे. मागील यादीत महाराष्ट्रातील सात जणांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसने जाहीर केलेल्या मतदारसंघामध्ये मध्य प्रदेशातील १२, महाराष्ट्र ४, मणिपूर २, राजस्थान ३, तामिळनाडू ७, उत्तर प्रदेश ९, उत्तराखंड २, पश्चिम बंगाल १, आसाम १, अंदमान, छत्तीसगड १ , निकोबार १ आणि जम्मू-काश्मीरच्या दोन अशा जागांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदींच्या विरोधात काँग्रेसचे अजय राय
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने अजय राय यांना मैदानात उतरवले आहे. शनिवारी रात्री (२३ मार्च) काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये अजय राय यांच्या नावाची घोषणा उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी करण्यात आली. त्यामुळे वाराणसी मतदारसंघ पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध अजय राय अशी लढत होणार आहे.
हेही वाचा : ‘मविआ’चा जागा वाटपाचा तिढा संपेना, पण काँग्रेसकडून यादी जाहीर; महाराष्ट्रातून आणखी चौघांना उमेदवारी
अजय राय कोण आहेत?
अजय राय यांचा वाराणसीमध्ये तळागाळातील जनतेपर्यंत मोठा संर्पक असल्याचे मानले जाते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून अजय राय यांनी राजकारणाला सुरुवात केली. १९९६ साली अजय राय यांनी कोलासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. २००९ साली अजय राय यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजय राय यांनी पाच वेळा आमदारकी भूषवली आहे. वाराणसीमधून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवलेली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा एकदा अजय राय यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसचे कोणते उमेदवार जाहीर?
प्रणिती शिंदे – सोलापूर लोकसभा मतदारसंघ
छत्रपती शाहू महाराज – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
गोवल पाडवी – नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
बळवंत वानखेडे – अमरावती लोकसभा मतदारसंघ
वसंतराव चव्हाण – नांदेड लोकसभा मतदारसंघ
रविंद्र धंगेकर – पुणे लोकसभा मतदारसंघ
रश्मी बर्वे – रामटेक लोकसभा मतदारसंघ
प्रशांत पडोळे – भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ
विकास ठाकरे – नागपूर लोकसभा मतदारसंघ
नामदेव किरसान – गडचिरोली लोकसभा मतदारसंघ