पीटीआय, रामनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात वापरलेल्या शब्दांनी वाहवत जाऊ नका, तर आगामी लोकसभा निवडणुकीत बदलासाठी मतदान करा असे आवाहन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी शनिवारी केले. उत्तराखंडमधील रामनगर येथे प्रचारसभेत बोलताना प्रियंका म्हणाल्या की, निवडणूक ही खऱ्या मुद्द्यांवर लढवली पाहिजे, पोकळ भाषणांच्या आधारे नाही.

प्रियंका म्हणाल्या की, ‘‘मोदी त्यांच्या निवडणूक प्रचारात काय बोलतात त्याने भुलू नका. तुमचे मत टाकण्यापू्वीर्वी तुम्ही स्वत:ला प्रामाणिकपणे विचारा की मोदी सरकारच्या १० वर्षांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कोणता सकारात्मक बदल झाला आहे’’? सतत वाढणारी बेरोजगारी, अनियंत्रित चलनवाढ आणि पेपरफुटीचे घोटाळे हे लोकांच्या आयुष्याचे सत्य आहे आणि त्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार जबाबदार आहे अशी टीका प्रियंका यांनी केली.

हेही वाचा >>>VIDEO | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर रोड शोदरम्यान दगडफेक, डोक्याला दुखापत; YSR आमदाराच्या डोळ्याला इजा

अंकिता भंडारी आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील महिलेच्या खुन्यांना संरक्षण देण्यासाठी कोण जबाबदार आहे असा प्रश्न लोकांनी मोदींना विचारावा असे आवाहन प्रियंका गांधी-वढेरा यांनी केले. मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या आणि प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्यासारखी जनतेला दिलेली कोणतीही आश्वास पाळली नाहीत असा आरोप त्यांनी केला. प्रत्येक निवडणुकीत भाजप मतांसाठी धर्माचा वापर करतो अशी टीका प्रियंका यांनी केली. आमच्यासाठी धर्म हा राजकीय प्रयोगासाठी नाही असे त्या म्हणाल्या.