नवी दिल्ली : नाटय़मय घडामोडींनतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अखेर मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार असल्याचे शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. ‘तटस्थ’ सोनिया गांधी यांनी खरगे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्यामुळे तसेच, ‘जी-२३’ या बंडखोर गटातील नेत्यांनीही पसंती दिल्यामुळे खरगे हेच नवे पक्षाध्यक्ष होण्याची शक्यता असून निवडणूक ही केवळ औपचारिकता उरली असल्याचे मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> काबूलमध्ये शिक्षण संकुलात आत्मघातकी स्फोट, १९ विद्यार्थी ठार; शियाबहुल भागात हल्ला, २७ जण जखमी

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माघार घेतल्यानंतर, गुरुवारी रात्री संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि ए. के. अ‍ॅण्टनी यांनी सोनिया गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर खरगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. खरगेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याआधी दिग्विजय सिंह यांनी खरगेंची भेट घेतली होती; पण आपण पक्षाध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे खरगेंनी सांगितले होते. मात्र, सोनिया गांधी यांनीच खरगेंच्या नावाला पाठिंबा दिल्यामुळे खरगे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तयार झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा दिग्विजय सिंह यांनी खरगेंची भेट घेतली आणि उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय जाहीर केला. खरगे वरिष्ठ नेते असल्याने त्यांच्या विरोधात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे दिग्विजय सिंह यांनी पत्रकारांना सांगितले. खरगेंच्या ३० अनुमोदकांपैकी दिग्विजय सिंह हेही एक अनुमोदक आहेत.

हेही वाचा >>> मुंबई-गांधीनगर ‘वंदे भारत’ आजपासून; शहरेच भारताचे भविष्य घडवतील : पंतप्रधान मोदी

अर्ज भरताना खरगेंबरोबर अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह, ए. के. अ‍ॅण्टनी, अंबिका सोनी, प्रमोद तिवारी, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, पवन बन्सल, पी. एल. पुनिया, पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा, मनीष तिवारी, भूपिंदर हुडा, तारीक अन्वर, राजीव शुक्ला, दीपेंदर हुडा, कुमारी सलेजा आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. खरगेंच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणारे सगळे नेते पक्षामध्ये विविध पदांवर आहेत. अनुमोदकांपैकी अनेक जण गांधी निष्ठावान मानले जातात. गांधी कुटुंबातील सदस्यांनी एकाही सदस्याला पाठिंबा जाहीर केलेला नसला तरी खरगे हे गांधी कुटुंबाचे ‘अधिकृत’ उमेदवार ठरले आहेत. पाठिंबा देणाऱ्या नेत्यांमध्ये बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांचाही समावेश होता.

हेही वाचा >>> जनसामान्यांशी संवादासाठी यात्रा हाच एकमेव पर्याय- राहुल 

खरगे यांनी १४, शशी थरूर यांनी ५ आणि झारखंडचे माजी मंत्री के. एन. त्रिपाठी यांनी १ उमेदवारी अर्ज भरला आहे. शनिवारी अर्जाची छाननी केली जाईल, अशी माहिती निवडणूक विभागाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी पत्रकारांना दिली. अर्ज पात्र ठरले आणि ते ८ ऑक्टोबपर्यंत मागे घेतले नाहीत तर खरगे, थरूर आणि त्रिपाठी या तीन उमेदवारांमध्ये लढत होईल. ‘‘मी लहानपणापासून काँग्रेसविचारांशी प्रामाणिक राहिलो आहे आणि त्याच विचाराने आयुष्यभर लढलो आहे. मी मोठा बदल घडवून आणण्यासाठी लढत आहे. अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते मी अर्ज भरताना उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो,’’ असे खरगे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले. काँग्रेसच्या प्रतिनिधींना मत देण्याचेही आवाहन त्यांनी केले. सुमारे नऊ हजार प्रतिनिधी १७ ऑक्टोबर रोजी मतदान करतील. १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाईल.

हेही वाचा >>> युक्रेनचे चार प्रदेश रशियात विलीन, पुतिन यांची करारावर स्वाक्षरी

‘जी-२३’ नेते ऐन वेळी खरगेंच्या मागे

काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शशी थरूर शुक्रवारी वाजतगाजत पक्षाच्या मुख्यालयात आले; पण अर्ज भरताना ते एकटे पडल्याचे चित्र दिसले. उमेदवारी अर्ज दाखल करताना बंडखोर ‘जी-२३’ गटातील एकही सदस्य त्यांच्याबरोबर नव्हता. बंडखोर नेते ‘तटस्थ’ राहिलेल्या सोनिया गांधींचे उमेदवार खरगे यांच्या शेजारी उभे होते.

थरूर यांचा दावा..

पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ‘अधिकृत उमेदवारा’बाबत होत असलेली चर्चा मला माहीत आहे; पण कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे सोनिया गांधी यांनी मला सांगितले आहे. गांधी कुटुंब काँग्रेसचा आधारस्तंभ आहे, असे शशी थरूर म्हणाले. थरूर निवडणूक प्रचाराची सुरुवात आज, शनिवारी नागपूरमधून करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता दीक्षाभूमीवर पत्रकार परिषदही घेणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला थरूर वर्धा येथे सेवाग्रामला जाणार आहेत. थरूर यांचा उमेदवारी अर्ज भरताना विदर्भातील नेते आशीष देशमुखही त्यांच्याबरोबर होते.

मी लहानपणापासून काँग्रेसविचारांशी प्रामाणिक राहिलो आहे आणि त्याच विचारांसाठी आयुष्यभर लढलो आहे. मोठा बदल घडवण्यासाठी मी निवडणूक रिंगणात आहे.

    – मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्षपदाचे उमेदवार

तुम्हाला सध्याचीच परिस्थिती कायम ठेवायची असेल तर तुम्ही खरगेंना मत द्या, पण तुम्हाला पक्षात बदल आणि प्रगती हवी असेल, तर मी त्या बदलासाठीच उभा आहे.

    – शशी थरूर, अध्यक्षपदाचे उमेदवार

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party president election kharge vs tharoor fight leaders g 23 group sonia gandhi support kharge ysh
First published on: 01-10-2022 at 00:02 IST