पीटीआय, नवी दिल्ली

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी लडाखमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. त्यांनी म्हटले आहे, की या केंद्रशासित प्रदेशाबाबत मोदींनी दिलेली हमी (गॅरंटी) हा विश्वासघात असून, ती प्रत्यक्षात चीनला मिळालेली ‘गॅरंटी’ आहे.

लडाख या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळावा आणि राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत घटनात्मक संरक्षण मिळावे या मागणीसाठी लडाखमधील प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या दोन आठवडय़ांपासून उपोषण करत आहेत.

हेही वाचा >>>चीनची भागीदारी असलेल्या पाकिस्तानमधील ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला; आठ अतिरेक्यांचा खात्मा

खरगे यांनी ‘एक्स’वर नमूद केले, की ही तर मोदींची चिनी हमी आहे! राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत आदिवासी समुदायांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी लडाखमध्ये जोरदार आंदोलने होत आहेत. परंतु मोदींनी दिलेल्या अन्य सर्व हमींप्रमाणे लडाखवासीयांचे घटनात्मक अधिकार सुनिश्चित करण्याची मोदींची हमी हा एक मोठा विश्वासघात आहे. ही हमी फसवी असून, चीनला अनुकूल आहे.

खरगेंनी आरोप केला, की मोदी सरकारला लडाखच्या पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील हिमालयीन हिमनद्यांचा फायदा घ्यायचा असून, त्यांच्या निकटवर्तीयांना फायदा मिळवून द्यायचा आहे. गलवान खोऱ्यात आमच्या २० शूर जवानांच्या बलिदानानंतर पंतप्रधान मोदींनी चीनला दिलेल्या निर्वाळय़ानंतर  आमच्या चीनलगतच्या सीमेवर चीनच्या विस्तारवादाला चालना मिळाली आहे. एकीकडे मोदी सरकारने देशाची अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली असून, दुसरीकडे लडाखवासीयांच्या घटनात्मक अधिकारांवर हल्ला होत आहे.

हेही वाचा >>>पुतिन, झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा; लोकसभा निवडणुकीनंतर दौरा करण्यासाठी निमंत्रण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर नमूद केले, की १९ जून २०२० रोजी चीनमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी एकही चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसला नसल्याचा दावा केला होता. पण चीनचे सैन्य आमच्या सैनिकांना सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या डेपसांग मैदानावर पोहोचण्यापासून रोखत आहे. मोदी चीनलगतच्या सीमेवरची तणावपूर्ण स्थिती दूर करण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.