सीमाशुल्क विभाग आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांच्या संयुक्त चमूने गुजरातमधील अदानी समूहाच्या मालकीच्या मुंद्रा बंदरावर केलेल्या कारवाईत, एका मालवाहू जहाजातून घातक किरणोत्सारी पदार्थ असलेले अनेक कंटेनर जप्त केले आहेत.

जप्त करण्यात आलेले कंटेनर पाकिस्तानातील कराची येथून चीनमधील शांघायमध्ये जात होते आणि ते मुंद्रा बंदरावर उतरणार नव्हते, अशी माहिती देशातील सर्वात मोठ्या असलेल्या अदानी बंदर प्रशासनाने (अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (एपीएसईझेड) दिली.

या मालवाहू जहाजात कुठलेही घातक पदार्थ नसल्याचे सांगण्यात आले होते, मात्र १८ नोव्हेंबरला सीमा शुल्क व डीआरआय यांच्या संयुक्त चमूने तपासणी केली असता जहाजातील कंटेनरमध्ये वर्गवारी ७ मधील घातक किरणोत्सारी पदार्थ असल्याचे उघड झाले. हे कंटेनर कराचीहून शांघायला जात होते आणि मार्गात मुंद्रा बंदरात किंवा भारतातील कुठल्याही बंदरात उतरणार नव्हते. मात्र या कारवाईनंतर ते पुढील तपासणीसाठी मुंद्रा बंदरावर उतरवण्यात आले, असे अदानी बंदर प्रशासनाने एका निवेदनात सांगितले.

या मोहिमेसाठी आपण सर्व प्रकारे सहकार्य केल्याचे सांगून, तत्काळ कारवाई व समन्वित कृतीसाठी प्रशासनाने सीमाशुल्क विभाग व डीआरआयच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. भारताला सुरक्षित ठेवणाऱ्या कुठल्याही कृतीसाठी आम्ही मदत करत राहू. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आम्ही अतिशय गांभीर्याने घेतो आणि त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड होऊ देणार नाही, अशी ग्वाही अदानी समूहाने दिली.