होळीच्या दिवशी दिल्लीत आत्मघातकी अतिरेक्यांद्वारे घातपात घडविण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला असून कुपवाडाहून त्यासाठी दिल्लीकडे निघालेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या सईद लियाकत अली शाह या संशयित अतिरेक्यास अटक केली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील गेस्टहाऊसमधून एके ५६ रायफल, स्फोटके व हातबॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत. दिल्लीत अजून काही अतिरेकी घुसले आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडाचा रहिवासी असलेला शाह हा रेल्वेने दिल्लीकडे निघाला असताना त्याला बुधवारीच गोरखपूर रेल्वे स्थानकावर अटक झाली. त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता पंधरा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
शाह हा पाकिस्तानात कराची येथे गेला होता. तेथून तो पाकिस्तानच्या पासपोर्टवर विमानाने नेपाळला गेला आणि नेपाळहून सीमेवरील सोनौली ठाण्यातून त्याने भारतात प्रवेश केला. भारतात जाताच तो पासपोर्ट नष्ट करण्यास त्याला सांगण्यात आले होते. तेथून तो दिल्लीला निघाला होता, असे विशेष विभागाचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी पत्रकारांना सांगितले. १९९७ मध्येच तो पाकिस्तानव्याप्त काश्मिरात गेला होता. तेथे त्याला घातपाताचे प्रशिक्षण दिले गेले होते. तो शरणागत अतिरेकी मात्र नाही, असेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील जामा मशिदीजवळच्या एका गेस्टहाऊसमध्ये आपल्यासाठी शस्त्रास्त्रे ठेवल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार टाकलेल्या छाप्यात एके ५६ रायफल आणि काही स्फोटके मिळाली. ती बाळगणारा अतिरेकी मात्र फरारी आहे. तो अतिरेकीच घातपात नेमका कुठे आणि कसा घडवायचा, हे सांगणार होता, अशी माहिती शाहने दिली आहे. दिल्लीतील घातपातानंतर काश्मीरला जाण्याचे आदेशही शाहला त्याच्या म्होरक्यांनी दिले होते.
शाह हा १९९३ मध्येच दहशतवादी गटांत सामील झाला होता. काश्मीरमधील २०११ सालच्या एका घातपातातही त्याचा हात होता. त्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते.