मानव तस्करी प्रकरणात पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांची शिक्षा पतियाळा हाऊस कोर्टाने सुनावली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीशांनी या शिक्षेला स्थगिती दिली आहे. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजीव कालरा यांनी केली. त्या दरम्यान त्यांनी पतियाळा कोर्टाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे दलेर मेहंदीला दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत दलेर मेहंदीला कोणत्याही प्रकारची शिक्षा दिली जाणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. दलेर मेहंदीला मानव तस्करी प्रकरणात जेव्हा पतियाळा कोर्टाने शिक्षा सुनावली त्यावेळी त्या शिक्षेच्या विरोधात दलेर मेहंदी यांच्या वकिलांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी असे या याचिकेत म्हटले गेले होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मे रोजी होणार आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर सिंग या दोघांनी १९९८ आणि १९९९ साली दोन ट्रुप घेऊन परदेशात गेले होते. त्यावेळी ट्रुपचे सदस्य असल्याचे दाखवून ते बेकायदरित्या दहा जणांना अमेरिकेत घेऊन गेले. बशिक्ष सिंग यांच्या तक्रारीवरुन पतियाळा पोलिसांनी २००३ साली दलेर आणि त्याचा भाऊ शमशेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या दोन भावांविरोधात घोटाळयाच्या अनेक तक्रारी समोर आल्या.