भारतात आता पुन्हा करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता कोविड सुपरमॉडेल पॅनलने धक्कादायक माहिती दिली आहे. यानुसार भारतात ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे २०२२ च्या सुरुवातीलाच करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तसेच फेब्रुवारीत तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू असू शकतो. सध्या भारतात दररोज नव्याने आढळणाऱ्या करोना रूग्णांची संख्या ७,५०० पर्यंत गेलीय. मात्र, ओमायक्रॉन विषाणूने डेल्टाची जागा घेतल्यानंतर हा आकडा आणखी वाढून भारतात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. नॅशनल कोविड १९ सुपरमॉडेल कमिटीच्या सदस्याने याबाबत माहिती दिली.

नॅशनल कोविड १९ सुपरमॉडेल कमिटीचे प्रमुख विद्यासागर म्हणाले, “भारतात ओमायक्रॉनची तिसरी लाट येऊ येऊ शकते, पण ती करोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. ही तिसरी लाट फेब्रुवारी २०२२ मध्ये येण्याची शक्यता आहे. देशभरातील नागरिकांमध्ये तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे ही लाट सौम्य असेल. सध्या भारतात दररोज जवळपास साडेसात हजार नवे रूग्ण आढळत आहेत. मात्र, ओमायक्रॉन विषाणूने डेल्टा विषाणूची जागा घेण्यास सुरुवात केल्यानंतर नव्या रूग्णांची संख्या वाढेल.”

“तिसऱ्या करोना लाटेत दुसऱ्या लाटेइतके अधिक रूग्ण आढळणार नाहीत”

“सेरो सर्वेक्षणानुसार आता डेल्टा विषाणूच्या संपर्कात आले नाहीत असे खूप कमी लोक आहेत. सध्या नागरिकांमध्ये ७५ ते ८० टक्के लोक डेल्टाच्या संपर्कात येऊन त्यांच्यात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झालीय. याशिवाय ८५ टक्के प्रौढांना करोनाचा एक डोस, तर ५५ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. यामुळे खूप कमी लोक आता विषाणूच्या संपर्कात आलेले नाहीत. त्यामुळेच तिसऱ्या करोना लाटेत दुसऱ्या लाटेइतके अधिक रूग्ण आढळणार नाहीत,” असं विद्यासागर यांनी सांगितलं.

हेही वाचा : “..तर भारतात दिवसाला १४ लाख करोना रुग्ण सापडतील”, नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांचा गंभीर इशारा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय आपण आरोग्य यंत्रणाही तयार केलीय. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करणं फारसं अवघड जाणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.