Cricketer Ravindra Jadeja’s Wife Rivaba Jadeja Inducted Into Gujarat Cabinet: गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे बदल करण्यात आले असून, मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यामध्ये क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा यांच्यासह २५ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. रिवाबा यांनी गुजरात मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
जामनगर उत्तरच्या आमदार रिवाबा यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेण्याचे पाऊल हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नवीन, तरुण चेहरे पुढे आणण्यासाठी आणि प्रादेशिक प्रतिनिधित्व संतुलित करण्यासाठी भाजपाचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
२ नोव्हेंबर १९९० रोजी राजकोट येथे जन्मलेल्या रिवाबा पहिल्यापासून सामाजिक कार्याशी संबंधित कुटुंबातील आहेत. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या रिवाबा यांना सरकारी नोकरी मिळवायची होती. पण, आता त्यांना थेट सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांचे काका हरिसिंह सोलंकी हे राजकोटमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. २०१६ मध्ये रिवाबा यांचे क्रिकेटपटू रवींद्र जडेजाशी लग्न झाले. रिवाबा आणि रवींद्र जडेजाचे राजकोटमध्ये रेस्टॉरंटही आहे. त्यांना निध्याना नावाची एक मुलगी आहे.
भाजपात प्रवेश करण्यापूर्वी रिवाबा जडेजा राजपूत संघटना करणी सेनेच्या सदस्या होत्या. २०१८ मध्ये करणी सेनेने संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत मोठे आंदोलन केले होते, तेव्हा त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्याच वर्षी त्यांना करणी सेनेच्या महिला अध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
रिवाबा जडेजा यांच्या भाजपामधील प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना, रवींद्र जडेजा आणि रिवाबा यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पुढच्या वर्षी, मार्च २०१९ मध्ये रिवाबा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
इतक्या प्रसिद्ध क्रिकेटपटूची पत्नी असूनही, रिवाबा यांनी जामनगरमध्ये महिलांसाठी केलेल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी राजकोटमध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या मातृशक्ती चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे.
२०२२ मध्ये भाजपाने जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर रिवाबा यांनी त्यांची पहिली निवडणूक लढवली. यामध्ये त्या ४० हजार मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या.