तौते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुळधार पाऊस

रायगडमध्ये ८ हजार ३६० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

Tauktae Cyclone Latest Update
तौते चक्रीवादळ हळूहळू मुंबईच्या दिशेने सरकू लागलं असून, किनाऱ्यांवर लाटा मोठंमोठ्या लाटा येऊन आदळत आहेत. (छायाचित्र।पीटीआय)

अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दिशेनं सरकत असलेले तौते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. मुंबईच्या समांतर समुद्रातून हे चक्रीवादळ पुढे जाणार असून, त्याचा परिणाम मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह राज्याच्या किनारपट्टी भागात बघायला मिळत आहे. मुंबईत एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आली असून, रविवारी रात्रीपासून मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा यासह इतर ठिकाणी पाऊस कोसळत आहे. तर पुढील काही तासांत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तौते चक्रीवादळ मुंबईला धडकणार नसले, तरी समुद्रातून गुजरातकडे सरकणाऱ्या या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मुंबई, ठाणे जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशाराही दिलेला आहे. दरम्यान, चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतर त्याचा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात वादळी पाऊस झाला.

हवामान विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे तौते चक्रीवादळ मुंबईपासून १७० किमी अंतरावर आहे. हे वादळ हळूहळू पुढे सरकत असून, याचा प्रभाव मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव यासह इतरही काही जिल्ह्यात दिसून आला आहे. रविवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली. तर पुणे, सातारा आणि जळगाव जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसला.

पुणे जिल्ह्यालाही वादळाचा फटका बसला आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या आणि नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील भोरगिरी आणि भिवेगाव परिसरात ७० घरांची पडझड झाली आहे. तर दोन अंगणवाड्या, प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयाचंही नुकसान झाल्याची माहिती आहे. तिकडे रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून, आतापर्यंत तब्बल ८ हजार ३६० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. जिल्ह्यात झाडं कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर अनेक घरांचं नुकसान झालं असल्याचं वृत्त आहे.

शनिवारी रात्री आणि रविवारीही मुंबईतील अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने २८.८ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्राने २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली होती. मात्र, रविवारी पावसाच्या सरींमुळे किमान आणि कमाल तापमानातही काहिशी घट झाली.

‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज

तौते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, अहमदनगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये प्रतितास ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून, जिल्ह्यांमधील काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रतितास ७५ ते ८५ किमी वेगाने वारे वाहणार असून, वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cyclone tauktae updates cyclonic storm to intensify further in 24 hours imd mumbai maharashtra bmh

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक