Darbhanga Mayor Anjum Ara: देशभरात सर्वत्र होळीनिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. आज होलिकादहन झाल्यानंतर उद्या देशातील विविध भगांत होळी (रंगपंचमी) साजरी केली जाणार आहे. दरम्यान उद्या शुक्रवारी होळी आणि रमजान महिन्यातील शुक्रवार एकाच वेळी आल्याने होळी आणि शुक्रवारच्या नमाजांबद्दल सतत विधाने केली जात आहेत. आता दरभंगाच्या महापौरांनी शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर होळी दीड तास थांबवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्लाती आता देशभरात उलट-सुलट चर्चा होऊ लागली आहे.

दरभंगा महानगरपालिकेच्या महापौर अंजुम आरा यांनी आवाहन केले आहे की, नमाजची वेळ निश्चित आहे आणि ती थांबवता येत नाही, म्हणून होळी दीड तास पुढे ढकलण्यात यावी.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी राजीव रोशन यांनी, होळीच्या वेळी कोणत्याही व्यक्तीला जबरदस्तीने रंग लावून वाद निर्माण करू नका, असे आवाहन केले आहे.

नमाजसाठी होळीला २ तासांचा ब्रेक घ्यावा

दरम्यान जिल्हा शांतता समितीच्या बैठकीला महापौर अंजुम आरा देखील उपस्थित होत्या. पण त्या अचानक या बैठकीतून मध्येच निघून गेल्या. यानंतर, माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “कोणाला कशाचा थोडासाही धोका जाणवला तर लगेचच प्रशासनाची मदत घ्या जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडणार नाही. होळी १२:३० ते २:३० च्या दरम्यान थांबवावी. नमाजसाठी होळीला २ तासांचा ब्रेक घ्यावा. कारण शुक्रवारची वेळ पुढे ढकलता येत नाही. म्हणून, सर्वांना विनंती आहे की, त्यांनी होळीचा कार्यक्रम दुपारी १२:३० ते २:०० पर्यंत थांबवावा आणि मशिदीपासून आणि नमाज पठण केले जाणाऱ्या ठिकाणांपासून अंतर राखावे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंजुम आरा यांना पक्षातूनच विरोध

नमाजसाठी होळी थांबवण्याचा सल्ला देणाऱ्या महापौर अंजुम आरा यांच्या विधानावरून बिहारमध्ये मोठा गदारोळ झाला आहे. संयुक्त जनता दलाच्या नेत्या असलेल्या अंजुम आरा यांना आता पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. संयुक्त जनता दलाचे नेते आणि नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले अशोक चौधरी यांनी अंजुम आरा यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. अशोक चौधरी म्हणाले की, “दरभंगाच्या महापौरांना पक्षातून काढून टाकावे. अशी विधाने सहन केली जाणार नाहीत.”