पीटीआय, दार्जिलिंग, सिलिगुडी
पश्चिम बंगालच्या उत्तर भागामध्ये रविवारी झालेल्या भूस्खलनामध्ये मृतांची संख्या वाढून २८ झाली आहे. सहा जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. दार्जिलिंग आणि सिलिगुडी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे, तसेच भूस्खलनामुळे बराचसा भाग ढिगाऱ्याखाली आहे. त्यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.
दुसरीकडे, या संकटाच्या निमित्ताने राज्यात पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस आणि भाजपदरम्यान वाद निर्माण झाला आहे. राज्याच्या उत्तर भागात झालेल्या भूस्खलनाला ‘दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन’ (डीव्हीसी) जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. दार्जिलिंग, जलपाईगुडी आणि कालिमपाँग या जिल्ह्यांमध्ये १२ तासांमध्ये ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे ४०पेक्षा जास्त ठिकाणी भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. शेकडो रहिवासी बेघर झाले आणि हजारो पर्यटक ठिकठिकाणी अडकून पडले.
सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे आणि भूस्खलनामुळे अनेक पूल तुटले आहेत. त्यामुळे विशेषतः दुर्गम भागांमध्ये बचावकार्य आव्हानात्मक झाले आहे. मिरिक, सुखियापोखरी, जोरेबंगलो आणि नागरकाटा या भागांमध्ये मोठी हानी झाली आहे. रस्ते चिखलाखाली गेले आहेत, पूल तुटले आहेत आणि गावे ढिगाऱ्यांखाली गाडली गेली आहेत. बचावकार्य अजूनही सुरू असून मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती उत्तर बंगाल विकास मंत्री उदयन गुहा यांनी दिली. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी बागडोगरा येथे जाऊन बचावकार्याची पाहणी केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला गृहदलाची नोकरी देण्याची घोषणा केली. या संकटाला ‘डीव्हीसी’ आणि केंद्र सरकारने केलेले दुर्लक्ष जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
हे मानव-निर्मित संकट आहे. झारखंडला वाचवण्यासाठी डीव्हीसी आपल्या इच्छेनुसार पाणी सोडते आणि त्याचा परिणाम बंगालला भोगावा लागतो. आम्ही दोन दशकांपासून मैथॉन आणि पंचेत धरणाचा गाळ काढण्याची मागणी करत आहोत. पण त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. केंद्राच्या दुर्लक्षामुळे आमची जीवितहानी झाली आहे. – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री
भाजप नेत्यांवर हल्ले
भाजपचे माल्दा उत्तरचे खासदार खागेन मुर्मू आणि सिलिगुडीचे आमदार शंकर घोष हे जलपाईगुडीमधील नागरकाटा येथे भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असता, जमावावर त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये मुर्मू यांच्या डोक्याला इजा झाली, तर घोष थोडक्यात बचावले. हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावेळी जमावातील काही जण “दीदी, दीदी” अशा घोषणा देत असल्याचे दृश्य वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले.
आम्ही जखमींची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी जमावाने आम्हाला घेराव घातला आणि मागून आमच्यावर हल्ला केला. खागेन यांना डोक्याला इजा झाली. तो भयानक प्रकार होता. – शंकर घोष, भाजप आमदार