Delhi Air Pollution: दिवाळीनिमित्त ग्रीन फटाके फोडण्याची सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर दिल्लीकरांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली. न्यायालयाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे आणि रात्रभर फाटके फोडल्यामुळे मंगळवारी सकाळी दिल्लीतील हवा प्रचंड प्रदूषित झाल्याचे दिसले. यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) गंभीर श्रेणीत पोहोचला आहे. दिवाळीच्या सणानिमित्त फटाके फोडण्याचे नियम शिथिल केल्यानंतर हवेचा दर्जा खालावला. मंगळवारी सकाळी दिल्लीतील सरासरी एक्यूआय ४५१ च्या वर पोहोचला होता.

सोमवारी (२० ऑक्टोबर) रात्री १० वाजता दिल्लीतील ३८ पैकी ३६ निरीक्षण केंद्रांनी प्रदूषण पातळी रेड झोनमध्ये असल्याचे नोंदवले होते. हवेची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याचे यातून दिसून आले होते. मात्र तरीही रात्रभर फटाके फोडले गेले.

फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाली असली तरी शेजारच्या राज्यांमध्ये पेंढा जाळणे आणि वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनामुळेही एक्यूआयमध्ये वाढ झालेली असावी, असाही अंदाज बांधला जात आहे.

delhi-pollution-news
मंगळवारी सकाळी दिल्लीत अनेक ठिकाणी धुराचे साम्राज्य दिसत होते.

दिवाळीच्या रात्री दिल्लीतील एक्यूआय खराब श्रेणीत पोहोचला होता. दिल्लीलगत असलेल्या नोएडा आणि गुरुग्राममध्येही हवेची स्थिती चांगली नव्हती. येथे मंगळवारी सकाळी AQI अनुक्रमे ४०७ आणि ४०२ होता. मागच्या वर्षी दिवाळीनंतर दिल्लीची एकूण हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली होती. तेव्हा AQI ३५९ वर असल्याचे नोंदवले गेले होते.

फटाक्यांवर बंदी होती, पण…

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येमुळे २०२० पासून दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली होती. कारण राजधानीत दरवर्षी हिवाळ्यात प्रदूषणाचा सामना करावा लागतो. मात्र यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर प्रदेशात १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी दिली. सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० अशी कालमर्यादा फटाके फोडण्यासाठी घालून देण्यात आली होती. मात्र दिल्लीकरांनी या नियमांना केराची टोपली दाखवली.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) म्हणजे काय?

वायू प्रदूषणाची पातळी दर्शविण्यासाठी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index – AQI) सांगितला जातो. त्यावरून त्या त्या दिवसाची वायू प्रदूषण पातळी किती आहे, याचा अंदाज घेतला जातो. अधिक एक्यूआयचा अर्थ अधिक प्रदूषण.

या निर्देशांकाच्या सहा श्रेणी आहेत. ० ते ५० चांगली, ५० ते १०० समाधानकारक, १०० ते २०० मध्यम प्रदूषित, २०० ते ३०० खराब, ३०० ते ४०० अतिशय खराब आणि ४०० ते ५०० गंभीर परिस्थिती.