दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आणि तिला गरोदर करणआऱ्या दिल्ली सरकारमधल्या अधिकाऱ्याचं निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्य सचिवांकडे आज संध्याकाळपर्यंत अहवाल मागितला आहे.
पीडित मुलीच्या वडिलांचं २०२० मध्ये निधन
पोलिसांनी रविवारी हे सांगितलं की दिल्ली सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याच्या विरोधात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जी पीडिता आहे तिच्या वडिलांचं २०२० मध्ये निधन झालं. तेव्हापासून पीडिता आरोपीच्या घरात आणि त्याच्या कुटुंबासह राहात होती. पीडितेचे वडील आणि हा अधिकारी हे दोघेही चांगले मित्र होते. वडिलांच्या निधनानंतर आधार म्हणून ती अधिकाऱ्याच्या घरी राहू लागली. मात्र तिच्या असाहयतेचा अधिकाऱ्याने गैरफायदा घेतला. ज्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे तो अधिकारी दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागात काम करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्याने नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत अनेकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपीच्या पत्नीने या मुलीला गर्भपाताची औषधं दिली असा आरोप तिच्यावरही आहे. जेव्हा वारंवार झालेल्या बलात्कारामुळे ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली तेव्हा तिने अधिकाऱ्याच्या पत्नीला ही बाब सांगितली. त्यावेळी पीडितेला अधिकाऱ्याच्या पत्नीने गर्भपाताची औषधं दिली असं पोलिसांनी म्हटलं आहे.
आपचे नेते सौरभ भारद्वाज यांची प्रतिक्रिया
आपचे नेते सौरभ भारतद्वाज यांनी असं म्हटलं आहे की महिला आणि बालविकास विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याने केलेलं हे कृत्य घृणास्पद आहे. ही अशी एक घटना आहे ज्यामुळे आम्हा सगळ्यांचीच मान शरमेने खाली गेली आहे. या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी होती. मात्र आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत आणि या प्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे. या अधिकाऱ्याला अद्याप अटक करण्यात आली नाही आणि हे दिल्ली पोलिसांचं अपयश आहे असंही सौरभ भारतद्वाज यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.