दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक केली जाऊ शकते असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी अटक केली होती. यानंतर आम आदमी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांनी व्हिडीओ मेसेजमध्ये “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्हाला सर्वांनाच जेलमध्ये टाका अशी विनंती करतो,” असं म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी मला माझ्या काही सूत्रांकडून केंद्र सरकार मनिष सिसोदियांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्याच्या तयारीत आहेत असं सांगितलं आहे. ते म्हणाले की, “मनीष सिसोदिया यांना लवकरच अटक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. केंद्राने सर्व यंत्रणांना त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत”.

“आम्हा सर्वांना एकाच वेळी अटक करा. आमची चौकशी करा, छापा टाका. त्यानंतर मग आम्ही आमचं काम करु शकतो. कारण आम्हाला राजकारण समजत नाही, आम्हाला फक्त काम कळतं,” असंही अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी याआधी जानेवारी महिन्यात सत्येंदर जैन यांच्याबाबत असाच अंदाज व्यक्त केला होता. “शिक्षण क्षेत्रात मनिष सिसोदिया यांनी केलेल्या कामामुळे फायदा झालेल्या १८ लाख विद्यार्थ्यांना मला विचारायचं आहे की, मनिष सिसोदिया भ्रष्ट आहेत का? त्यांना जगासमोर भारताला गौरव मिळवून दिला आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीला अटक केली पाहिजे की सन्मान केला पाहिजे?,” अशी विचारणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

“सत्येंदर जैन यांनी आम्हाला मोहल्ला क्लिनिक सुरु करण्यास तसंच लोकांना लस मिळवून देण्यात मदत केली. ते कसं काय त्यांना भ्रष्टाचारी म्हणत आहेत? मला विद्यार्थी आणि पालकांना विचारायचं आहे की मनिष आणि सत्येंदर जैन भ्रष्ट असू शकतात का? जर ते भ्रष्टाचारी असतील तर मग प्रामाणिक कोणाला म्हणायचं?,” असंही अरविंद केजरीवालांनी विचारलं आहे.