दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीने अटक केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. २१ दिवसांच्या अंतरिम जामीनाची मुदत संपल्यानंतर आज अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. तुरुंगामध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अरविंद केजरीवाल हे अंतरिम जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा जामीनाची मुदत वाढवून मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, मुदत वाढवून मिळण्याच्या जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला होता. तसंच त्यांच्यावतीने दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळण्याची याचिकाही दाखल केली होती. या याचिकेवरील निर्णय राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ५ जूनपर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे.

हेही वाचा : सिक्कीममध्ये भाजपाला धोबीपछाड! ३२ पैकी ३१ जागांवर सत्ताधारी पक्षाचा ऐतिहासिक विजय, एका जागेवर कोण जिंकलं?

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी आज तुरुंगामध्ये आत्मसमर्पण करण्याआधी दुपारी साडेतीन वाजता सर्वप्रथम राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीवर जाऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर केजरीवाल यांनी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरालाही भेट दिली. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यालयात दाखल होत पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. यावेळी केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.

कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधताना केजरीवाल म्हणाले, “देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहे. मी परत कधी येईन माहीत नाही. तिथे माझे काय होईल? हे मला माहीत नाही. आज मी पुन्हा तिहार तुरुंगात जात आहे. या २१ दिवसांपैकी एक मिनिटही मी वाया घालवला नाही. मी फक्त आम आदमी पक्षासाठी प्रचार केला नाही तर मी मुंबई, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंडमध्येही प्रचार केला. आपल्यासाठी देश महत्वाचा आहे. मी दिल्लीच्या लोकांना सांगू इच्छितो की, मी कोणताही घोटाळा केलेला नाही. मात्र, हुकूमशाही विरुद्ध आवाज उठवला म्हणून तुरुंगात टाकलं”, असं केजरीवाल म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केजरीवालांना अटक झालेलं प्रकरण काय?

दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात अनियमितता झाल्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर आहे. त्यांच्याबरोबरच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरही आरोप असून ते गेल्या एक वर्षभरापासून तुरुंगात आहेत. दरम्यान, मद्य परवाना देताना बदल्यात कमिशन स्वरूपात पैसे घेतल्याचा आरोप आहे. तसेच या पैशांचा वापर गोवा विधानसभा निवडणुकीत करण्यात आला असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.