Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने एका वकिलाला अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. एका प्रकरणावरील सुनावणी दरम्यान चॅट बॉक्सवर अवमानकारक टिप्पणी केल्याने न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपाखाली उच्च न्यायालयाने एका वकिलाला चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग आणि न्यायमूर्ती अमित शर्मा यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावली.

या प्रकरणात खंडपीठाने म्हटलं की, वकिलाने केलेल्या टिप्पण्या न्यायिक अधिकारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि न्यायालयाचा स्पष्टपणे अवमान करणाऱ्या आहेत. त्यामुळे अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी वकिलाला दोषी ठरवलं जात आहे. त्यांनी संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अनादर केला असून त्यांनी कोणतीही माफी मागितलेली नाही. तसेच त्यांचं हे संपूर्ण वर्तन हे न्यायालयाची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. हे वर्तन तिरस्काराच्या बाजूने दिसून येत असून वकील म्हणून पात्र असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून असा प्रकार होता कामा नये, असं खंडपीठाने स्पष्ट केलं. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

हेही वाचा : CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी विचारला प्रश्न; AI वकिलाने दिलेल्या उत्तरानं सर्वच अवाक

तसेच खंडपीठाने असंही स्पष्ट केलं की, वकिलाने या प्रकरणी माफी देखील मागितली नाही किंवा त्यांच्या वर्तनाबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप दिसत नाही. त्यामुळे वरील बाबी पाहता या न्यायालयाचे न्यायिक अधिकारी, पोलीस अधिकारी आणि न्यायाधीश यांच्या विरोधात ३० ते ४० तक्रारी दाखल केल्याने त्यांचा हेतू न्यायालयाची बदनामी करण्याचा आहे हे स्पष्ट होते, असं स्पष्ट करत वकिलाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास खंडपीठाने नकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मे महिन्यात न्यायाधीशांनी वकिलाविरुद्ध स्वत:हून फौजदारी अवमान खटला सुरू केला होता. कारण वकिलाने न्यायाधीशांवर वैयक्तिक टीका केली होती. तसेच न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान चॅट बॉक्समध्ये अपमानास्पद टिप्पण्या केल्या होत्या. खंडपीठाने सांगितले की, वकिलाने न्यायिक अधिकारी आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि पोलिस अधिकाऱ्यांवर बदनामीकारक आरोप केले. या सर्व बाबी लक्षात घेऊन खंडपीठाने वकिलाला चार महिन्यांचा कारावास आणि दोन रुपये दंडही ठोठावला. तसेच त्याला कोठडीत कारागृहात पाठवण्याचे निर्देशही पोलिसांना दिले.