Baba Ramdev Sharbat Jihad Row Delhi High Court : पतंजलीच्या फेसबूक पेजवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये बाबा रामदेव यांनी ‘सरबत जिहाद’चा उल्लेख केला होता. “बाजारात लोकप्रिय असलेल्या सरबत विक्रेत्या कंपन्या त्यांच्या नफ्यातील मोठा हिस्सा मशीद आणि मदरसे बनविण्यासाठी देत आहेत”, असा दावा करत रामदेव यांनी या सरबतांऐवजी पतंजलीचा गुलाब सरबत विकत घेण्याचा आग्रह केला होता. एका कंपनीच्या सरबताचा उल्लेख करत त्यांनी टीका केली होती. यावरून आता दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव यांना कठोर शब्दांत सुनावलं आहे. तसेच त्यांना न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी नोटीस बजावली आहे.

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव यांना दोषी ठरवलं आहे. एका सरबताचा उल्लेख करत हा सगळा सरबत जिहाद असल्याचं वक्तव्य करणाऱ्या रामदेव यांच्या या वक्तव्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज सुनावणी केली आणि रामदेव यांना अवमानना नोटीस बजावली आहे. तसेच न्यायालयाने म्हटलं आहे की बाबा रामदेव हे कोणाच्याही नियंत्रणात नाहीत. ते त्यांच्याच जगात राहतात. न्यायमूर्ती अमित बन्सल म्हणाले, “रामदेव यांनी न्यायालयाच्या मागील आदेशाचं उल्लंघन केलं आहे.”

“असं वाटतंय रामदेव यांच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही”

हमदर्द फूड्स कंपनीने रामदेव यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने रामदेव यांच्या सरबत जिहाद या टिप्पणीवर आक्षेप घेतला होता. यावरील सुनावणीवेळी न्यायमूर्ती रामदेव यांच्या वकिलांना म्हणाले, “असं वाटतंय रामदेव यांच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही.” हमदर्दचे वकील मुकूल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं की न्यायालयाच्या आदेशानंतरही रामदेव यांनी आधीच्या व्हिडीओसारखाच आणखी एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. यावर रामदेव यांचे वकील राजीव नैय्यर म्हणाले, “आक्षेपार्ह व्हिडीओ आम्ही समाजमाध्यमांवरून हटवू”. यावर न्यायालयाने सांगितलं की रामदेव यापुढे अशी टिप्पणी करणार नाहीत अशा आशयाचं प्रतित्रापत्र देखील रामदेव यांनी न्यायालयापुढे सादर करावं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या बाजूला ‘सरबत जिहाद’वरून टीका-टिप्पणी सुरू झाल्यानंतर रामदेव म्हणाले होते की “मी कोणाचं नाव घेतलंच नव्हतं. रूह अफ्जा वाल्यांनी स्वतःच हे सगळं ओढवून घेतलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की ते सरबत जिहाद करत आहेत”. याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव यांच्या रूह अफ्जा हा सरबत जिहाद असल्याच्या वक्तव्यावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. न्यायमूर्ती अमित बन्सल म्हणाले होते की रामदेव यांचं हे वक्तव्य अक्षम्य आहे. हे वक्तव्य सामाजिक सौहार्दासाठी योग्य नाही, हे वक्तव्य द्वेष पसरवणारं आहे. त्यावेळी देखील वकील नैय्यर म्हणाले होते की वादग्रस्त व्हिडीओ हटवले जातील.