शनिवारी संध्याकाळी गुजरातच्या राजकोटमध्ये एका गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत मोठी जीवितहानी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. हे वृत्त प्रकाशित होत असेपर्यंत राजकोटच्या घटनेत तब्बल २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे राजकोटमध्ये अग्नितांडव चालू असताना दुसरीकडे राजधानी दिल्लीतही शनिवारी रात्रीच्या सुमारास भीषण आगीची घटना घडली. दिल्लीच्या विवेक विहार परिसरातील न्यू बॉर्न बेबी केअर सेंटरला लागलेल्या आगीत सात नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं दिल्लीत?

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीत शनिवारी रात्री न्यू बॉर्न बेबी केअर सेंटरला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन विभागाचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. रविवारी पहाटेपर्यंत आग विझवण्याचं काम चालू होतं. रात्री साडेअकराच्या सुमारास लागलेली ही आग पहाटे ४ च्या सुमारास आटोक्यात आली.

दरम्यान, या दुर्घटनेत सापडलेल्या पाच अर्भकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यातील एका अर्भकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या आगीसाठी नेमकं काय कारण ठरलं, याचा शोध सध्या घेतला जात असून शॉर्ट सर्किटचं प्राथमिक कारण दिलं जात आहे. तसेच, रुग्णालयाला देण्यात आलेल्या परवानग्यांचीही चौकशी आता केली जात आहे.

रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सिलेंडर्सचा साठा

दरम्यान, या बेबी केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सिलेंडर्सचा साठा करण्यात आला होता, अशी माहिती आता समोर येत आहे. आगीची घटना घडली, तेव्हा या सिलेंडर्सपैकी अनेक सिलेंडर्स फुटल्याची माहिती अग्निशमन अधिकारी अतुल गर्ग यांनी दिली आहे. या घटनेत बेबी केअर सेंटरच्या बाजूच्या इमारतीमध्येही आग पसरली होती. मात्र, तिथे कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचंही अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग; २७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये १२ चिमुरड्यांचा समावेश

राजकोट गेमिंग झोन आगीत २६ जणांचा मृत्यू

राजकोटमध्ये एका गेमिंग झोनमध्ये लागलेलेल्या आगीत २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. रात्री उशीरापर्यंत आग विझवण्याचं काम चालू होतं. या प्रकरणात गेमिंग झोनचा मालक आणि तिथल्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, या गेमिंग झोनच्या मालकाने अग्निशमन विभागाची व संबंधित जागेवर गेमिंग झोन चालवण्याची परवानगी घेतली नव्हती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता काही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली असली तरी राजकोटचे जिल्हाधिकारी प्रभव जोशी यांनी बाहेरच्या अतीउच्च तापमानामुळे गेमिंग झोनमधील वातानुकूलित यंत्रणेच्या वायरिंगवर अतिरिक्त ताण पडल्यामुळे ही शॉर्ट सर्किटची घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.