लग्न लावून देतो म्हणून सांगितलं आणि त्यासाठीचे २० रुपये घेऊन केला पोबारा… हॉटेलमधून सिगारेटचं पाकिट व दारूची बाटली चोरीला, पकडून देणाऱ्याला १० रुपयांचं बक्षिस… ११ संत्र्यांच्या चोरीसाठी ५ जणांना १ महिन्याचा सश्रम कारावास! या सगळ्या गोष्टी एखाद्या कॉमेडी शोमध्ये किंवा विनोदी नाटकात शोभाव्यात अशा वाटत असल्या, तरी हे आजपासून जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वीचे गंभीर गुन्हे होते! या गुन्ह्यांची रीतसर FIR नोंद झाली. काही गुन्ह्यांचा छडा लागला, तर काहींचा अजूनही छडा लागला नाही!

दिल्ली पोलिसांनी सध्या एक अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्यांच्याकडच्या सर्व नोंदींचं वेबसाईटवर डिजिटायझेशन करण्याचं काम सध्या चालू आहे. त्यातून अनेक गंभीर गुन्ह्यांबरोबरच काही रंजक गोष्टीही समोर येत आहेत. त्यात दिल्लीत तब्बल १०० ते १५० वर्षांपूर्वी नोंद झालेल्या २९ भन्नाट घटनांच्या तक्रारी आणि त्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या नोंदी दिल्ली पोलिसांच्या पर्सेप्शन मॅनेजमेंट अँड मीडिया सेलच्या पथकाला सापडल्या आहेत.

दिल्ली पोलिसांना सापडलेल्या या नोंदींमध्ये १८६१ ते १९०० या काळातील अनेक घटना असून त्यापैकी बहुतेक या दरोड्याच्या आहेत. १०४ कबुतरांची चोरी, तळ्याच्या काठावरून ११० बकऱ्यांचिी चोरी, पायजम्याची जोड चोरली, ११ संत्री चोरल्या, एक दारूची बाटली चोरली, बेडशीट, ताटली, अगदी कुल्फी चोरीला गेल्याचीही तक्रार पोलिसांना या नोंदींमध्ये आढळून आली आहे!

लग्न लावून देतो सांगून २० रुपयांची फसवणूक!

दिल्ली पोलिसांना सापडलेल्या नोंदींमध्ये १९०० साली दाखल झालेल्या एका गुन्ह्याची नोंद आहे. यामध्ये शिवा नावाच्या पीडित व्यक्तीला फतेह नावाच्या एका ओळखीच्या व्यक्तीने फसललं. फतेहनं लग्नासाठी चांगली मुलगी शोधून लग्न लावून देतो असं सांगून शिवाकडून त्यासाठी तब्बल २० रुपये घेतले. १६ वर्षांच्या मुलीशी लग्न लावतो असं आश्वासनही दिलं. पण लग्नाच्या दिवशी शिवाला समजलं की मुलगी १६ वर्षांची नसून वयस्कर आहे. ही महिला मांडवातूनच पळून गेली. यानंतर शिवानं पोलिसांत तक्रार दाखल केली.

‘एक टमाटर की कीमत….’, टोमॅटोच्या वाढत्या दरावर Twitter पडला मीम्सचा पाऊस! पाहा नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

झाडाची चोरी, पाच रुपयांचा दंड

पोलिसांना १ ऑक्टोबर, १८९९ रोजी नोंद करण्यात आलेली एक FIR सापडली असून त्यात एका व्यक्तीने सार्वजनिक रस्त्यावरून चक्क एक झाडच चोरल्याची नोंद आहे. त्यानं हे झाड त्याच्या शेतात नेऊन लावलं त्याच्या या गुन्ह्यासाठी त्याला अटक करण्यात आली. नंतर पाच रुपयाचा दंडही ठोठावण्यात आला.

सिगारेट, दारूच्या बाटलीची ‘हाय प्रोफाईल’ केस!

दरम्यान, याच नोंदींमध्ये पोलिसांना एक ‘हाय प्रोफाईल’ केसही आढळून आली आहे. १८९७मध्ये तेव्हाच्या नवी दिल्लीच्या सुप्रसिद्ध इम्पेरियल हॉटेलमध्ये एक चोरीची घटना समोर आली. हॉटेलच्या आचाऱ्यानं यासंदर्भातली एक तक्रार सब्जी मंडी पोलीस स्थानकात केली होती. इंग्रजीतून सादर केलेल्या या तक्रारीत चोरीचा घटनाक्रम त्यानं सांगितला होता. त्यानुसार, एक चोर हॉटेलच्या एका खोलीत आले आणि त्यांनी एक आख्खं सिगारेटचं पाकीट व दारूची एक बाटली चोरली. चोरांना पकडून देणाऱ्याला हॉटेलनं तब्बल १० रुपयांचं बक्षिसही जाहीर केलं! पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ना सिगारेटचं पाकिट सापडलं, ना दारूची बाटली!

“तुझीच सुष…” बॉयफ्रेंडला Sorry म्हणण्यासाठी तरुणीने लावला भलामोठा बोर्ड, मजकूर वाचून आणि फोटो पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

११ संत्रींची चोरी, १ महिन्याचा सश्रम कारावास!

१६ फेब्रुवारी १८९१ रोजी दिल्लीच्या सब्जी मंडी पोलीस स्थानकात ११ संत्री चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. त्या आधारावर पोलिसांनी FIR ची नोंद केली. त्यानुसार, राम बक्ष नावाच्या आरोपीने त्याच्या चार ते पाच साथीदारांच्या मदतीने राम प्रसाद यांच्या बागेतून ११ संत्रींची चोरी केली. २३ फेब्रुवारी १८९१ रोजी म्हणजे गुन्ह्याच्या अवघ्या आठवड्याभरात आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यासाठी आरोपींची एका महिन्याच्या सश्रम कारावासासाठी रवानगी करण्यात आली!