आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी धाडसी आणि निर्णायक उपाययोजना करण्याचे सूतोवाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी येथे केले. गेली काही वर्षे आपल्यासाठी आव्हानात्मक ठरली आहेत. आता आपल्या समोर अवधी थोडा आहे. त्यामुळे विकासाचा दर वाढण्यासाठी पुन्हा एकदा धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले. १९९१ मध्ये आर्थिक सुधारणांना प्रारंभ झाला तेव्हा वाढीचा दर साधारण साडेसात टक्के होता. त्यावेळी आपल्याला त्याचे पूर्ण फायदे मिळाले. आता २०१२-१३ या वर्षांत आपल्या वाढीचा दर पाच टक्क्य़ांवर आला असल्याकडे मनमोहन सिंग यांनी लक्ष वेधले.  मात्र, असे असले तरी आम्ही अधिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही सरकारला आर्थिक स्तरावरील असमतोलाचा सामना करावा लागतो आणि ऊर्जा, पाणी आणि जमीन यासारख्या मुख्य क्षेत्रांच्या आव्हानांकडे दुर्लक्ष करता येत नाही, असा इशारा त्यांनी दिला.