न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासातील उपमहावाणिज्य आयुक्त देवयानी खोब्रागडे यांच्या अटक प्रकरणावरून केंद्र सरकारने बुधवारी आणखी कठोर पवित्रा घेत त्यांची न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्रांच्या स्थायीस्वरूपी मिशनमध्ये बदली केली. या बदलीमुळे आता देवयानी यांना राजनैतिक अधिकाऱ्याला असलेल्या सर्व प्रकारच्या विशेषाधिकारांचे कवच प्राप्त झाले आहे. दरम्यान, देवयानी यांची अटक हे सुनियोजित कटकारस्थानच होते असा आरोप केंद्र सरकारने केला आहे.
देवयानी यांच्या अटक प्रकरणावर बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा झाली. देवयानी यांना ज्या प्रकारे अपमानास्पद वागणूक देण्यात आली ती निषेधार्हच असून ती केवळ एका दिवसातील घटना नसून यामागे सुनियोजित कट असल्याचा आरोप परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी केला. त्यांनी यासंदर्भातील तपशीलवार माहितीही संसदेच्या पटलावर ठेवली.
दरम्यान, भारतातील अमेरिकी दूतावासाच्या सुरक्षाव्यवस्थेत केलेली कपात तसेच दूतावासातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विशेषाधिकारांवर आणलेली गदा याबाबत अमेरिकेने भारताकडे चिंता व्यक्त केली. अमेरिकेसह सर्वच दूतावासातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार योग्य त्या सुविधा पुरवतो व इतर देशांकडूनही तशीच अपेक्षा ठेवतो असे उत्तर भारताकडून देण्यात आले.
अमेरिका नरमली
भारताच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर नरमलेल्या अमेरिकेने आता देवयानी अटक प्रकरणातील तथ्य तपासून घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. देवयानी यांच्यावरील सर्व आरोप रद्दबातल करण्याच्या भारताच्या मागणीचाही विचार करण्याचे आश्वासन अमेरिकेने दिले आहे.  

घटनाक्रम असा..
* जून-जुलैदरम्यान देवयानी यांच्या घरातील नोकर संगीता रिचर्ड अचानक गायब झाली
* खोब्रागडे यांनी याबाबत न्यूयॉर्क पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली. मात्र, कारवाई शून्य. एक दिवस अचानक देवयानी यांना एका अज्ञात व्यक्तीचा दूरध्वनी आला.
* संगीताच्या बेपत्ता होण्याबाबतची तक्रार मागे घेऊन प्रकरण मिटवावे व त्या मोबदल्यात भरपूर पैसे व अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव या अज्ञात व्यक्तीने देवयानींसमोर ठेवला
* खोब्रागडे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. संगीताच्या गायब होण्याविषयी तसेच तिच्या कुटुंबियांच्या व्हिसाविषयी अमेरिकन दूतावासाला कल्पना भारताने दिली होती
* परंतु भारताच्या या माहितीकडे अमेरिकी दूतावासाने हेतुपुरस्सररित्या दुर्लक्ष केले. संगीताचा पती फिलीप व त्याची दोन मुले १० डिसेंबरला अमेरिकेला रवाना झाली
* त्यानंतर दोन दिवसांनी खोब्रागडे यांना अटक झाली

हे प्रकरण अत्यंत खेदजनक आहे. दूतावासातील अधिकारी व कर्मचारी हे देशाचे प्रतिनिधी असतात. त्यांचा अपमान हा देशाचा अवमान असतो.
    – मनमोहन सिंग</strong>