Operation Sindoor : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक महत्वाचे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली होती. तसेच भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर मोठी कारवाई करत ते उद्धवस्त केले होते.
भारताने पाकिस्तानच्या विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने काही लढाऊ विमाने गमावल्याचा दावा केला जात होता. मात्र, हा दावा केंद्र सरकारने फेटाळून लावला होता. मात्र, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने काही फायटर जेट्स गमावल्याचा आरोप करण्यात येत होता. असं असतानाच आता इंडोनेशियातील एका कार्यक्रमात बोलताना कॅप्टन शिव कुमार यांनी मोठा खुलासा केला आहे.
कॅप्टन शिव कुमार हे नौदलातील कर्नल रँकचे अधिकारी आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानशी झालेल्या लष्करी संघर्षाच्या पहिल्या दिवशी भारताने काही लढाऊ विमाने गमावल्याचं कॅप्टन शिव कुमार यांनी मान्य केलं आहे. भारत सरकारने पाकिस्तानी लष्करी आस्थापनांवर हल्ला करण्यावर आधी निर्बंध लादले होते आणि फक्त दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे भारताने काही लढाऊ विमाने गमावल्याचं शिव कुमार यांनी मान्य केलं आहे. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.
कॅप्टन शिव कुमार म्हटलं की, “भारताने इतकी विमाने गमावली याबाबत मी सहमत नाही. पण मी हे मान्य करतो की आपण काही विमाने गमावली आहेत आणि ते केवळ राजकीय नेतृत्वाने लष्करी आस्थापनांवर आणि पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला न करण्याच्या निर्बंधामुळे घडलं आहे”, असं कॅप्टन शिवकुमार यांनी सांगत मान्य केलं आहे. दरम्यान, एका भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने हे मान्य केल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून याच मुद्यावरून काँग्रेसने देखील सरकारला अनेक सवाल विचारले होते. मात्र, काँग्रेसच्या प्रश्नांनंतर केंद्र सरकारने कोणतंही प्रत्युत्तर दिलं नव्हंत. पण आता कॅप्टन शिव कुमार यांनी केलेल्या या दाव्यानंतर आता काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झालं असून सरकारला पुन्हा सवाल विचारले आहेत.