पीटीआय, नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सोमवारपासून सुरू होत असून पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी विरोधक करत असून केंद्र सरकारही त्यास प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत.
लोकसभेच्या कामकाज समितीच्या २१ जुलैच्या बैठकीत केंद्र सरकारने पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवर १६ तास चर्चेची तयारी दर्शविली आहे. लोकसभेत सोमवारपासून चर्चा सुरू होणार असून राज्यसभेत मंगळवारी चर्चेला सुरुवात होणार आहे. या चर्चेला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सुरुवात करणार आहेत. गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांसह भाजप नेते या चर्चेत सहभागी होणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासह इतर अनेक सदस्य सरकारविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करू शकतात.