Pablo Escobar’s Hippos To Be Transferred In Gujrat: १९८० च्या दशकात ड्रग लॉर्ड पाब्लो एस्कोबारने आफ्रिकेतून बेकायदेशीरपणे आयात केलेल्या चार पाणघोड्यांची संख्या मागील काही दशकात वाढलेली आहे. अशावेळी प्राणिसंख्या नियंत्रणाचा भाग म्हणून ड्रग लॉर्डच्या पूर्वीच्या घराजवळ राहणारे किमान ७० पाणघोडे भारत आणि मेक्सिकोमध्ये हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, सध्या सरकारने या पाणघोड्यांना विषारी आक्रमक प्रजाती घोषित केले आहे. नेमका या प्राण्यांना स्थलांतरित करण्याचा हेतू काय व ही प्रक्रिया कशी पार पडणार हे जाणून घेऊयात.

सध्या बोगोटापासून २०० किमी अंतरावर मॅग्डालेना नदीकाठी असलेल्या हॅसिंडा नेपोल्स रॅंचच्या पलीकडे ३ टन वजनाचे पाणघोडे राहतात. पर्यावरण अधिकार्‍यांचा अंदाज आहे की अँटिओक्विया प्रांतात सुमारे १३० हिप्पो आहेत आणि त्यांची लोकसंख्या आठ वर्षांत ४०० पर्यंत पोहोचू शकते.

१९३३ मध्ये किंगपिनला पोलिसांनी मारले तेव्हापासून एस्कोबारचे पाणघोडे स्थानिक पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. मात्र आता शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार, कोलंबियामध्ये पाणघोड्यांचा नैसर्गिक शिकारी नाही. यामुळे जैवविविधतेसाठी धोका निर्माण होत आहे. या पाणघोड्यांच्या विष्ठेमुळे नद्यांची रचना बदलते तसेच अन्य प्राण्यांच्या संख्येवरही परिणाम होत आहे. परिणामी सरकारने पाणघोड्यांना विषारी आक्रमक प्रजाती घोषित केले आहे.

महाकाय पाणघोडे भारतात आणणार कसे?

प्रस्तावानुसार, पाणघोड्यांना मोठ्या, लोखंडी कंटेनरमध्ये टाकण्यासाठी अन्नाचे आमिष दाखवले जाईल आणि ट्रकद्वारे १५० किमी दूर असलेल्या रिओनेग्रो शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाठवले जाईल. इथून त्यांना भारत आणि मेक्सिकोला पाठवले जाईल, जिथे प्राण्यांची काळजी घेण्यास सक्षम अभयारण्ये आणि प्राणीसंग्रहालय आहेत.

भारतातील गुजरातमधील ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन किंगडममध्ये ६० पाणघोडे पाठवण्याची योजना आहे तर आणखी १० पाणघोडे मेक्सिकोतील प्राणीसंग्रहालय आणि सिनालोआ येथे असलेल्या ओस्टोक सारख्या अभयारण्यांमध्ये जातील.