दुबई… जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत नुसती वाळूच वाळू असलेलं शहर! हजारो किलोमीटरवर पसरलेलं वाळवंट… जिथे कधीतरीच पाऊस पडतो अशा दुबईत अतिवृष्टी होऊन पूर आला आहे. ही बातमी पाहून अनेकांचा विश्वास बसणार नाही. परंतु, दोन वर्षांत दुबईत जितका पाऊस पडतो तितका पाऊस एकाच दिवसात पडल्यामुळे तिथले रस्ते आणि शहराचा बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे. १६ एप्रिल रोजी या ‘डेजर्ट सिटी’मध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर हा पाऊस थांबण्याचं नावच घेत नव्हता. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट चालू होता. दुबईवासियांना अशा वातावरणाची बिलकूल सवय नाही. मुसळधार पावसामुळे काही तासांत दुबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली.

दुबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, अनेक मेट्रो स्थानकं, मॉल्स, रस्ते, व्यावसायिक इमारतींमध्ये पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, दुबईत ठिकठिकाणी पाणी साचलं असून त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. अनेकजण ‘ही मुंबई नसून दुबई’ आहे, अशा शब्दांत या पूराचं वर्णन करत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या २४ तासांत १६० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांमध्ये मिळून या भागात इतका पाऊस होतो. दोन वर्षांत जितका पाऊस होतो तितका पाऊस एकाच दिवसांत झाल्यामुळे दुबईतलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सेवा काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. दुबईत उतरणारी आणि येथून उड्डाण करणारी सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. दुबईहून अबू धाबी, शारजाह आणि अजमानला ये-जा करणारी बससेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे. वादळ आणि अतिवृष्टीचा अनेक घरांना फटका बसला आहे. दुबईतल्या अनेक मोठ्या शॉपिंग सेटर्समध्ये, दुबई मॉल आणि मॉल ऑफ एमिरेट्समध्येदेखील पाणी शिरलं आहे.

हे ही वाचा >> इस्रायलवर केलेला हल्ला इराणला भोवणार, अमेरिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

पावसामुळे अख्खी दुबई जलमय झाली असून दुबईतली सर्व प्रकारची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यासह अनेकजण बेपत्ता असल्याची बातमी समोर येत आहे.