पीटीआय, नवी दिल्ली

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणाशी संबधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नवीन आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये बीआरएसच्या आमदार आणि तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे अशी माहिती अधिकृत सूत्रधारांनी दिली. ‘ईडी’ने कविता यांना १५ मार्च रोजी हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. त्यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. 

‘ईडी’ने या प्रकरणात दाखल केलेले हे सातवे आरोपपत्र असून ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’शी संबंधित विशेष न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा १३ मे रोजी त्याची दखल घेण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये मोठय़ा प्रमाणात मद्य परवाने मिळवण्याच्या बदल्यात ‘आप’ला १०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप असलेल्या दक्षिण गटाच्या कविता या महत्त्वाच्या सदस्य असल्याचा आरोप ‘ईडी’ने ठेवला आहे. ‘‘के कविता या दिल्ली मद्य धोरण घोटाळय़ाच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आणि लाभार्थी होत्या. कविता यांनी अरविंद केजरीवाल आणि तत्कालीन उत्पादनशुल्क मंत्री मनिष सिसोदिया यांच्याबरोबर व्यवहार ठरवला.’’ त्या २९२.८० कोटींशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी होत्या असा ‘ईडी’चा दावा आहे.

हेही वाचा >>>तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हुकूमशाही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उच्च न्यायालयाकडून ‘ईडी’ला विचारणा

या प्रकरणी के कविता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने ‘ईडी’ला आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितली. पुढील सुनावणी २४ मे रोजी होईल.