India Pakistan War Tension Updates: पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद भारतात उमटताना दिसत आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संतप्त भावना सामाजिक, राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सीमेवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये आता अमेरिकेने भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध टाळण्यासाठी मध्यस्थी सुरू केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी यासंदर्भात पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी व भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आहे.

संघर्ष वाढवू नका, अमेरिकेचा सल्ला

अमेरिकेने भारत व पाकिस्तानला या मुद्द्यावरून संघर्ष न वाढवण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॅमी ब्रुस यांनी यासंदर्भात बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानंतर रात्री परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले परराष्ट्रमंत्री जयशंकर?

एस जयशंकर यांनी गुरुवारी सकाळी या चर्चेसंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. “अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशी काल रात्री पहलगाम हल्ल्यासंदर्भात चर्चा झाली. या हल्ल्याचे गुन्हेगार, त्यांना पाठबळ देणारे आणि हल्ल्याचं नियोजन करणारे अशा सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी”, असं जयशंकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचंच या पोस्टमधून स्पष्ट होत असल्याचं बोललं जात आहे.

पाकिस्तानला हल्ल्याचा निषेध करण्याचा सल्ला

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मार्को रुबियो यांनी पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याचा निषेध करावा व यासंदर्भातल्या तपासात पूर्ण सहकार्य करावं, असा सल्ला दिल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॅमी ब्रुस यांनी दिली आहे. पाकिस्ताननं भारतासोबत एकत्र प्रयत्न करून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, थेट संपर्क पुन्हा सुरू करावा आणि दक्षिण आशियात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करावी, असंही त्यांनी शरीफ यांना सांगितल्याचं ब्रुस म्हणाले.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन

एकीकडे भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेकडून मध्यस्थी केली जात असताना दुसरीकडे पाकिस्तानकडून मात्र सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर निर्बंध लादले. मात्र, तेव्हापासून रोज पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात आहे. भारताकडूनही याचं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर परिस्थिती निवळण्याऐवजी अधिकच तणावपूर्ण होऊ लागल्याचं दिसून येत आहे.